कळस : जायकवाडी नंतर राज्यातील दोन नंबरचे ११७ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या उजनी धरणातील पाणी ३८ टक्के उणे पातळीत गेल्याने जलाशयावरील पाणी उपशावर बंधन घालण्यात आले आहे. महावितरण कंपनीने शेती सिंचनाच्या वीजपुरवठ्यात दोन तासांची कपात केली आहे. आठ तास दिली जाणारी वीज आता सहा तासच मिळणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली दरवर्षी वीस टीएमसी नदीपात्रात वाया जाते. मात्र प्रशासनाकडून धरणग्रस्तांच्या पाणी उपशावर बंधन आणण्यासाठी दोन तास वीज कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. इंदापूर तालुक्यातील २८ गावे उजनी धरणात बुडीत तर ५ गावे बाधित झाली. या गावांतील शेतकऱ्यांना धरणाच्या निर्मितीनंतर सुरवातीला बारमाही पाणी उपशाचे परवाने देण्यात आले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून आता आठमाही पाणी परवाने दिले जात आहेत. यंदा धरण ६० टक्के भरल्याने पाण्याचे वेळीच योग्य नियोजन झाले नाही. पाणीसाठा आज उणे ३७.४७ टक्क्यांवर पोचला आहे धरण यावर्षी प्रथमच उजनीच्या इतिहासात उणे ७० टक्के होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडून जिल्हाधिकाऱ्यांना उजनीच्या उपसा सिंचन धारकांच्या पाणी वापरावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे नमूद करत, जिल्ह्यातील दौंड व इंदापूर तालुक्यातील सिंचनाच्या पाणी वापरावर नियंत्रण आणण्यासाठी वीज कपातीची मागणी पत्रव्यवहाव्दारे केली होती. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी बारामतीच्या विद्युत कंपनीचे अधीक्षक अभियंत्यांना वीज पुरवठ्यात दोन तास कपात करण्याची सूचना केली आहे. यानुसार तालुक्यातील वीज पुरवठ्यात दोन तासांची कपात करुन वीज पुरवठ्याचे सुधारीत वेळापत्रक जाहीर केले आहे. उजनीलगतच्या कांदलगाव, शहा, शिरसोडी, पडस्थळ, अजोती, कालठण, गंगावळण, कळाशी, चांडगाव, पळसदेव, डाळज, कुंभारगाव, भिगवण, तक्रारवाडी, डिकसळ, भावडी, अगोती यांसारख्या निव्वळ उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या हजारो ट्रान्सफार्मचा वीज पुरवठा कपात करण्यात आला आहे.