(बारामती)सांगवी - सांगवी (ता.बारामती) येथील राहत्या घरातून रात्री दहा वाजल्यापासून बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेचा शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून ही आत्महत्या नसून घातपात असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. याबाबत माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी घटना स्थळी जाऊन पाहणी केली आहे.
सविता अप्पासाहेब सालगुडे (वय 42) रा.सांगवी (ता.बारामती) असे आत्महत्या केलेल्या मृत विवाहित महिलेचे नाव आहे. ही घटना शनिवार (दि.17) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. महिलेची आत्महत्या नसून संशयास्पद घातपात केल्याची देखील सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आत्महत्येच्या घटने नंतर संतप्त नातेवाईकांच्या जमावाने संशयास्पद असलेल्या तरुणाला रस्त्यावर ओढत बेदम मारहाण केली. संशयास्पद तरुणाला नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीमुळे महिलेची आत्महत्या नसून घातपात असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
मृत सविता सालगुडे या शुक्रवारी (दि.16) रोजी राहत्या घरातून रात्री बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर घरच्यांनी त्यांचा शोध घेतला असता त्या कुठेही आढळून आल्या नाहीत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शेतात गवत आणायला गेलेल्या काही महिलांना सविता सालगुडे या बारामती फलटण रस्त्याच्या कडेला शिरवली हद्दीतील शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यानंतर सांगवीतील प्रतिष्ठित नागरिक व नातेवाईकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी शेतात लिंबाच्या झाडाला मृत महिलेच्या गळ्याला दोरीचा फास लाऊन तिचे पाय जमिनीला टेकले होते. तर शेजारीच बांधावर चप्पल आढळून आली. त्यानंतर महिलेचा मृतदेह रुई ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला होता.
सविता सालगुडे या पतीसोबत हॉटेल चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होत्या. यामुळे झालेल्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. . याबाबत माळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होण्यासाठी उशीर लागणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली. यामुळे आत्महत्या की घातपात याबाबत अध्याप अस्पष्टता आहे.