पुणे : पती घरात नसताना नातेवाईक तरुणाने एका विवाहितेवर वारंवार बलात्कार केला. पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतून हा प्रकार उघडकीस आला. 29 वर्षीय विवाहित महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार याच महिलेचा नातेवाईक असलेल्या 27 वर्षीय तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एप्रिल 2021 ते ऑगस्ट 2022 या काळात हा सर्व प्रकार घडला.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, महिला लोणीकंद परिसरात पतीसह राहते. तिचा पती हा चालक असल्यामुळे तो दिवसभर घराबाहेर असायचा. याचाच फायदा घेऊन आरोपी असलेल्या महिलेच्या नातेवाईकाने घरात येऊन वारंवार तिच्यासोबत ओळख वाढवली. त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. इतकेच नाही तर आरोपीने फिर्यादी महिलेला बदनामी करण्याची धमकी देऊन व्हिडिओ कॉल केला. दोघांचेही नग्न अवस्थेतील फोटोचे स्क्रीनशॉट काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली.
दरम्यान आरोपी वारंवार घरात येऊन धमकी देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत असल्याने महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. लोणीकंद पोलीस अधिक तपास करत आहेत.