सांगवी (बारामती) : विवाहितेला टेम्पो घेण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये घेऊन येण्याचा तगादा लाऊन चारित्र्यावर संशय घेत वारंवार मानसिक,शारीरिक त्रास देत छळवणूक करून घराच्या बाहेर काढल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह सासू,सासरा,दीर व जावे विरूध्द माळेगाव पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चांदणी शरद काळे (वय ३२),(मुळ रा.हिंगणी ता.खटाव जि.सातारा, सध्या रा.अंजणगाव ता. बारामती) यांनी आरोपी शरद विलास काळे (पती), विलास आत्माराम काळे (सासरे),रंजना विलास काळे (सासु),अमित विलास काळे (दिर), शितल अमित काळे ( जाव) सर्व रा.हिंगणी (ता.खटाव,जि. सातारा) यांच्या विरोधात जाचहाट छळ करून उपाशीपोटी ठेवुन वारंवार शिवीगाळ दमदाटी केल्या बाबत फिर्याद दिली आहे.
(१ सप्टेंबर २०१८ )रोजी ते (१७ ऑगस्ट २०२२) च्या दरम्यान मुंबई उरण व हींगणी (ता. खटाव) येथे पतीसह वास्तव्यास असताना आठ महिन्यांनंतर शरद हा दररोज दारु पिऊन शिवीगाळ करुन मारहाण करत होता. पतीसोबत मुंबईला असताना दीर अमित याला दुकान टाकायचे म्हणुन पतीने पैसे दिले. तेव्हा आपल्याला पण संसार आहे. त्यांना पैसे का देता अशी फिर्यादीने विचारणा केली असता फिर्यादीला तेथुन पुढे वारंवार मारहाण करुन तिचा छळ सुरू केला. फिर्यादी मुंबईवरून हिंगणी (ता.खटाव) सासरी आल्यास लग्नात आम्हाला काही दिले नाही. म्हणुन आम्हाला टॅम्पो घ्यायचा आहे. माहेराहुन १० लाख रुपये घेऊन ये असा सासु,सासरे, दिर व जाव यांनी तगादा लावला होता. माहेरची परिस्थिती बिकट असताना नातेवाईकांनी सासरच्या लोकांना समजावुन सांगितले होते. यावेळी फिर्यादीचे वडील संजय सूरसिंग परकाळे रा.अंजनगाव (ता.बारामती) यांनी कुटुंबातील सदस्यांची बैठक घेवुन समजूत घातली. परंतु, सासरच्या लोकांच्यात काही फरक पडला नाही. त्यावर सासु रंजनाने एकर शेती विकेल परंतु, तुझा माज उतरविन अशी फिर्यादीला धमकी दिली.
त्यानंतर संचारबंदीच्या कालावधीत सासरी असताना सासरे विलास काळे, सासु रंजना काळे हे फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेऊन छळ करु लागले. तसेच दिर अमित काळे, जाव शितल काळे दोघे काही ना काही कारणावरुन भांडणे काढुन मारहाण करू लागले. वडीलांनी लग्नात केलेले सोने घेऊन पुनः न देता तुला काय करायचे ते कर असे म्हणुन सासु, सासरे यांनी घराच्या बाहेर काढले. फिर्यादी नांदत असताना तीन वर्षांच्या कालावधीत एक मुलगा व मुलगी झाली. त्यानंतर पतीला अल्सर झाला असता पतीने काम सोडले. त्यानंतर पती दररोज दारु पिऊन वारंवार त्रास देऊ लागला. मारहाण करत उपाशीपोटी ठेऊन जाच करू लागला. असे नमूद फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पोलीस नाईक रुपाली धीवार अधिक तपास करीत आहेत.