पुणे : ब्युटी पार्लरचे काम देतो, असे सांगून बांगला देशातून एका अल्पवयीन मुलीला पुण्यात आणून तिला वेश्या व्यवसायासाठी विकल्याचा प्रकार समोर आला आहे. मागील दोन वर्षांपासून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. या प्रकरणी कुंटणखाना मालिकिणीसह तिघांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कुंटणखाना मालकिण डोल्मा राजू तमांग (वय ५५, रा. बुधवार पेठ), मारिया ऊर्फ सोनी आणि एका नेपाळी दलालावर गुन्हा दखल केला आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस हवालदार मनिषा पुकाळे यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्युटी पार्लरचे काम देतो, असे सांगून बांग्लादेशातील महिला दलाल मारीया ऊर्फ सोनी हिने बांग्लादेशातील ढाका येथील एका १७ वर्षाच्या मुलीला विना परवाना भारतात आणले. तिला सोनी हिने एका नेपाळी पुरुषाच्या हवाली केले. त्याने पुण्यात आणून कुंटणखाना मालकीण डोल्मा तमांग हिच्याकडे ठेवले. तिच्याकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होता. याची सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळाली़ त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून या तरुणीची सुटका केली आहे. पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करीत आहेत.