पुणे : किरकोळ कारणावरून झालेल्या वादावादीत मामाने भाच्याच्या छातीत चाकू भोसकून त्याचा खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास नऱ्हे येथील कृष्णाईनगरी येथे घडली. पोलिसांनी तत्काळ आरोपी मामाला अटक केली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. गजानन गजकोश (१५, रा. धारावी कोळीवाड्याजवळ, मुंबई) असे मृत भाच्याचे नाव आहे. तर मेघनाथ अशोक तपासे (४१, रा. फ्लॅट नं. १०१, कृष्णाईनगरी, मानाजीनगर, नऱ्हे) असे आरोपी मामाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन हा मुंबईतून मामाकडे राहण्यासाठी आला होता. शुक्रवारी रात्री त्याचे मामाच्या मुलासोबत किरकोळ भांडण झाले. त्यामुळे चिडलेल्या मामा मेघनाथने गजाननला पट्ट्याने मारहाण केली. त्यानंतरही मामाचा राग शांत झाला नाही. त्याने घरातील चाकूने गजाननच्या छातीत डाव्या बाजूस मारून त्याला गंभीर जखमी केले. त्यातच गजाननचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपीचा मेहुणा मंगेश दत्तात्रय ओव्हाळ यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपी मामाला बेड्या ठोकल्या. पुढील तपास सिंहगड रोड पोलिस करत आहेत.