पुणे : बड्या बापाच्या अल्पवयीन मुलाने आलिशान कारच्या अपघातापूर्वी केलेल्या पार्टीत दोन तासांत मद्य व जेवणावर मित्रांसोबत तब्बल ४८ हजार रुपये उडवले असल्याची माहिती त्यानेच पोलिसांना दिली आहे.
अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने वाहन चालवून केलेल्या अपघातात दोन जणांना जीव गमवावा लागला. या अल्पवयीन बाळाने नुकतीच बारावीची परीक्षा दिली हाेती. मित्रांबरोबर तो रविवारी रात्री पार्टी करण्यासाठी गेला होता. पार्टीला जाताना त्याने वडिलांकडून पोर्शे ही महागडी कार घेतली होती. मुलगा मद्यप्राशन करतो, याची माहिती बांधकाम व्यावसायिक वडिलांना होती. अल्पवयीन मुलगा व त्याच्या मित्रांनी हाॅटेल कोझी आणि हाॅटेल ब्लॅकमध्ये मद्य प्राशन केले. तेथे त्यांनी जेवण केले. दोन तासांत मुलाने मद्यपार्टीवर ४८ हजार रुपये खर्च केले. पोलिसांनी दोन्ही हाॅटेलमधील चित्रीकरण तपासले. तेव्हा मुलगा आणि त्याचे मित्र मद्यप्राशन करीत असल्याचे दिसून आले आहे. हाॅटेलमधील बिल मुलाने ऑनलाइन दिल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी ऑनलाइन बिल अदा केल्याच्या नोंदी तपासासाठी ताब्यात घेतल्या आहेत. पोलिसांनी मुलाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी ससून तसेच खासगी रुग्णालयात पाठविले आहेत. अद्याप रक्त तपासणी अहवाल पोलिसांना मिळालेला नाही.
दरम्यान, अल्पवयीन मुलाला जामीन देताना बाल न्याय मंडळाने त्याला पंधरा दिवस येरवडा विभागातील ट्रॅफिक कॉन्स्टेबलसोबत वाहतुकीचे नियोजन करावे. अपघातावर त्याने निबंध लिहावा या अटी, शर्तीवर जामीन दिला. पण, मुलाने अटी-शर्तींचे पालन केलेच नसल्याचे समोर आले आहे. जामिनाची ऑर्डर आम्हाला अद्याप मिळाली नसल्याचे वाहतूक पोलिस आयुक्त यांनी सांगितले. तर ऑर्डर दिल्याचे बाल न्याय मंडळाकडून सांगितले जात आहे. एकमेकांच्या कोर्टात चेंडू टोलवला जात असल्यामुळे मुलगा नक्की अटी-शर्तींचे पालन करणार का, असा प्रश्न आहे. २२ तारखेला अपघात प्रकरणातील या अल्पवयीन आरोपीला दुपारी बाल न्याय मंडळात पोलिसांमार्फत हजर होण्याची सूचना देण्यात आली आहे. या गुन्ह्यात कलमवाढ होऊन आरोपीला सुधारगृहात ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.
बाल न्याय मंडळाची ऑर्डर वाहतूक पोलिसांना मिळालेली नाही. जामीन मंजूर झाल्यापासून अटी-शर्तींची पूर्तता आरोपीला करावी लागते. - रोहिदास पवार, पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा