बारामती/निरगुडसर: समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातातबारामती येथील वकिलांच्या बहिणीचे कुटुंब उद्धवस्त झाले आहे . येथील अँड अमर काळे यांची बहीण कांचन गंगावणे (वय 38), त्यांचे पती कैलास गंगावणे (वय 48) व सई गंगावणे (वय 20) या तिघांचाही समृद्धी महामार्गावरीलअपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती पहाटे पुढे आली आहॆ .या घटनेमुळे काळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .
मुळचे शिरूर येथील हे कुटुंब नोकरीच्या निमित्ताने निरगुडसर येथे वास्तव्यास आहेत. कैलास गंगावणे हे पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात २७ वर्ष प्राध्यापक म्हणून काम करत होते. गंगावणे कुटुंबीयांच्या मुलाला नागपूरमधील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. त्याला महाविद्यालयात सोडून हे कुटुंबीय विदर्भ ट्रॅव्हल्स बसने पुण्याला यायला निघाले होते. आज पहाटे सिंदखेड राजा येथे पिंपळखुटा नजिक बसचा अपघात झाला. त्यात तिघांचा मृत्यू झाला. गंगावणे कुटूंबातील सदस्यांनी या तिघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो काही झाला नाही.
या तिघांचाही फोन लागत नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर व बसच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अमर काळे यांनी शोध सुरू केला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनील कुमार मुसळे यांनी देखील तातडीने हालचाल केली. या अपघातात बाबत बुलढाण्याच्या पोलीस अधीक्षकांची संपर्क साधून तातडीने माहिती घेतली. नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या प्रवाशांच्या यादीमध्ये या तिघांचेही नाव असल्याने तिघांचा म्रुत्यु झाल्याचे स्पष्ट झाले आहे .तसेच त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन अपघात स्थळी असल्याने हे तिघे या बसमधून प्रवास करत होते, अशा निष्कर्षाप्रत पोलीस आलेले आहेत. काळे कुटुंबीयांनी गंगावणे कुटुंबीय याच बसमधून प्रवास करत असल्याचे सांगितले. सई गंगावणे ही अतिशय हुशार विद्यार्थीनी होती तिला तिच्या गुणवत्तेवर आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता व ती वैद्यकीय शिक्षणाची विद्यार्थिनी होती.