पुणे: सायबर चोरटे फसवणुकीसाठी नवनवीन युक्त्या करुन लोकांना गंडा घालत असतात. एखादी बाब लोकांच्या लक्षात आली व लोक सावध होऊ लागले की दुसरा फंडा काढला जातो. बेरोजगारीची समस्या लक्षात घेऊन सायबर चोरट्यांनी आता पार्ट टाईम जॉबचा नवा फंडा काढला आहे.
पार्ट टाईम जॉब करुन प्रतिदिन अडीच ते तीन हजार रुपये कमवा अशा जाहिरातीला बेरोजगार फसवत असून अनेक जण या मोहात अडकून आपले लाखो रुपये गमवत असल्याचे दिसून येत आहे. सायबर चोरट्यांच्या नव्या फंड्यात अनेक जण अडकत आहे. आपटे रोडवरील एका ५४ वर्षाचा नागरिक या मोहाला बळी पडला आणि ३ लाख ६८ हजार रुपये गमावून बसला आहे. हा प्रकार २३ ते १६ मार्च दरम्यान घडला.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांची सोलापूरात शेती असून ते सध्या पुण्यात राहतात. त्यांना एकदा पार्ट टाईम जॉब करुन प्रतिदिनी २५०० रुपये कमवा असा मेसेज आला. यु ट्युबवर काही जाहिरातीचे लिंक्स लाईक व सबक्राईब केल्यास प्रति व्हिडिओस ३० रुपये मोबदला मिळेल, असे सांगितले गेले. तीन व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना टेलिग्रॉम अप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. त्यांचा आयडी तयार करण्यात आला. प्रथम त्यासाठी त्यांना ५० रुपये ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आले. थोड्या वेळाने त्यांच्या खात्यात ९० रुपये जमा झाले. त्यांना एका ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले. माइंड शेअर ही कंपनी जगातील मोठमोठ्या ई कॉमर्स कंपन्यांचे ब्राडिंग व सेल्स वाढविण्याचे काम करते, तुम्ही प्रिपेड टास्क केल्यास अॅडव्हान्स २० टक्के कमिशन मिळेल, असे सांगितले. ते बिटकाइनचे काम असल्याचे व त्यांना कसा व्यवहार करायचे हे समजावून सांगण्यात आले. त्यांनी डेमो व्यवहार करुन घेतले. त्यानंतर त्यांना प्रिपेड टास्क देण्यात आला. त्यासाठी एक हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्याबदल्यात १२०० रुपये व २१० रुपये व्हिडिओ बघण्याचे बदल्यात असे १४१० रुपये त्यांच्याकडे जमा झाले.
त्यानंतर त्यांना मोठमोठ्या रक्कमेचे नवीन नवीन टास्क देण्यात येत होते. त्यासाठी वेगवेगळा ग्रुप तयार केला जात होता. २८ हजार, ५२ हजार असे ८० हजार रुपये त्यांनी भरले. मात्र, हे पैसे भरल्यानंतर एक ट्रेडिंग अपूर्ण राहिल्याचे भासवून त्यामुळे ग्रुपमधील सर्वांचे व्यवहार अपूर्ण राहिले असल्याचे भासवले. त्यानंतर ग्रुपमधील इतरांचे नुकसान होऊ नये, म्हणून फिर्यादी यांनी नातेवाईकांकडून पैसे घेऊन ते भरले. तरीही व्यवहार पूर्ण होत नसल्याने त्यांनी घरातील सेव्हिंगमधून पैसे काढून अडीच लाख रुपये भरले. त्यानंतर बिटक्राईनचा ट्रेडिंग राऊंड पूर्ण झाल्याचे त्यांना भासविण्यात आले. मात्र, या व्यवहाराला फिर्यादीमुळे उशीर झाल्याने पुढील ६ लाख रुपयांचा ट्रेडिंग राऊंड पूर्ण करावा लागेल, असे सांगितले. ग्रुपमधील बाकींच्यानी पुढील दोन तासात ६ लाख रुपये पैसे ट्रान्सफर करुन त्याचे स्क्रिन शॉट टाकले. परंतु, एवढी मोठी रक्कम जमा करणे शक्य नसल्याने त्यांनी टिचर महिलेला कळविले. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपली फसवणूक होत आहे. तोपर्यंत त्यांनी ३ लाख ६८ हजार रुपये भरले होते. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असून पोलीस निरीक्षक पठाण तपास करीत आहेत.