पुणे : अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भुंकप झाला आहे. शरद पवारांबरोबरच कोणालाही काही न कळू देता अजित पवारांनी अचानकपणे असे पाऊल उचलल्याने कार्यकर्त्यांना मोठा धक्काच बसला आहे. या सर्व घडामोडीनंतर आता राष्ट्रवादीचेच पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांची तंबी झाल्याचे दिसून येत आहे. आपण कोणाला साथ द्यावी हेच कार्यकर्त्यांना कळत नाहीये. पुण्यातील वरिष्ठ कार्यकर्त्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला आहे. तर काही जणांनी अजितदादांना पाठिंबा दिला आहे. अशातच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या काल अजित पवारांच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांसोबत उपस्थित होत्या. त्यावरून हे चित्र स्पष्ट होतंय कि त्या अजित पवारांसोबाबत आहेत. या घडामोडीनंतर नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. चाकणकर यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ एकत्र काम करणार आहेत. राजकीय वर्तुळात यांना एकत्रित काम करताना पाहण्याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.
चित्रा वाघ या एकेकाळी राष्ट्रवादीमध्ये होत्या. दोन अडीच वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीला रामराम केला. आणि भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र रुपाली चाकणकर या सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीत आहेत. त्यावेळी या दोघी जिवाभावाच्या मैत्रिणी होत्या. पक्ष सोडल्यानंतर त्यांची मैत्री चांगली होती. पण महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणांनंतर त्यांच्यात फूट निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. महिला आयॊगाच्या अध्यक्षपदावरून दोघींच्या वादाला सुरुवात झाली. चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा होण्यापूर्वी भाजपच्या नेत्या विजया रहाटकर या आयोगाच्या अध्यक्षपदी होत्या. राज्यातील भाजपची सत्ता गेल्यापासून हे पद रिक्त होते. राष्ट्रवादीच्या माजी आमदार व प्रवक्त्या विद्या चव्हाण, माजी सनदी अधिकारी चंद्रा अय्यंगार यांची नावं या पदासाठी चर्चेत असताना चाकणकर यांच्या नावावर शिक्कमोर्तब करण्यात आला. त्यावरून वाघ यांनी चाकणकर यांच्यावर निशाणा साधला होता. किमान रावणाला मदत करणारी ‘शूर्पणखा’ त्या जागेवर बसवू नका. अन्यथा प्रत्येक वेळी सरकारचंच नाक कापलं जाईल,' असं वाघ यांनी ट्विट केलं होतं.
चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यात ट्विटर वॉरही मोठ्या प्रमाणावर झालं होत. भाजप नेते नरेंद्र मेहता प्रकरणावरुनही या दोघी आमनेसामने आल्या होत्या. नरेंद्र मेहतांवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या दोघींमध्ये ट्विटरवॉर रंगलं होतं. हिंगणघाट जळीतकांड प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकारच्या काळात नागपूर जिल्ह्यातल्या हिंगणघाटमध्ये एका तरुणीला जिवंत जाळण्यात आलं होतं. त्यावरुन चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. पुण्यातल्या रघुनाथ कुचिक प्रकरणात शिवसेना नेते असलेल्या रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यातल्या एका युवतीनं बलात्काराचे आरोप केले होते. या प्रकरणात चित्रा वाघ यांनी रान उठवलं. पण त्या युवतीनं काही दिवसातच तक्रार मागे घेत चित्रा वाघ यांच्यावरच उलट आरोप केले होते.
महाराष्ट्रात झालेल्या राजकीय महाभूकंपानंतर रुपाली चाकणकर या अजित पवारांसोबाबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. चित्रा वाघ या राष्ट्रवादीत असताना पक्षाचे महिला प्रदेशाध्यक्ष पद वाघ यांना देण्यात आले होते. आता हेच पद रुपाली चाकणकर यांना कालच्या पत्रकार परिषदेत देण्यात आले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे एकत्र काम करणार आहे. जर वेळ आलीच तर चाकणार आणि वाघ यांनाही पुन्हा एकत्र काम करावे लागणार आहे. पूर्वीचा रुसवा फुगवा सोडून काही महिन्यांपूर्वी एकमेकांवर टीका करणाऱ्या रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांना एकत्र काम करताना पाहण्याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.