पुणे: दहीहंडी उत्सव गुरुवारी असला तरी शहराच्या अनेक भागात बुधवारपासूनच जोरजोरात डीजेचा धिंगाणा सुरू होता. कानाचे पडदे फाटतील अशा आवाजाने परिसर दणाणून सोडला जात होता. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबतच्या तक्रारी येत होत्या. जवळपास ४० ते ५० तक्रारी एकाच रात्रीत नियंत्रण कक्षाला आल्या.
वडगाव शेरी, चंदननगर, वारजे, कोथरूडसह शहराच्या अनेक भागात आजच डीजेचा दणदणाट ऐकायला मिळत होता. अनेक ठिकाणी बुधवारीच रोड बंद केले होते. मोठ्या आवाजात लावलेल्या डीजेवर भररस्त्यात तरुणाई नाचण्यात दंग होती. त्यामुळे पीएमपी बससह अन्य वाहनांना जाण्यास रस्ता न मिळाल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याच्या नागरिकांनी तक्रारी केल्या.
याबाबत शहर पोलिस नियंत्रण कक्षाकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, मोठ्या आवाजात डीजे सुरू असल्याच्या अनेक तक्रारी मिळाल्या. तक्रार मिळताच संबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी यांना जागेवर पाठवून डीजे बंद करण्यात आला.