पुणे: अतिशय हुशार असलेली व सध्या बारावी सायन्समध्ये ही १७ वर्षाची मुलगी शिकत आहे. कॉलेजमधील एका समुपदेशनाच्या कार्यक्रमात तिचा संयम सुटला अन तिने समुपदेशकांना आपल्यावर गेल्या ६ वर्षापासून होत असलेल्या अत्याचाराची दर्दनाक कहानी कथन केली. उत्तर प्रदेशातील गावाकडे असताना चुलत्याने दमदाटी करुन तिच्यावर वर्षभर अत्याचार केला. आजोबांनी तिचा वारंवार विनयभंग केला. ही बाब तिने आपल्या वडिलांना चिठ्ठी लिहून कळविली. पुण्यात आल्यावर वडिलांनीच तिच्यावर गेली ४ वर्षे अत्याचार केल्याचे समोर आले. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी तिच्या ४९ वर्षाच्या नराधम बापाला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिचे आई वडिल पुण्यात मोलमजुरी करुन राहतात. घरची परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी फिर्यादीला उत्तर प्रदेशातील आपल्या मुळ गावी राहायला पाठविले. २०१६ ते २०१८ या काळात ही मुलगी साधारण १२ -१३ वर्षाची असताना मुळगावी ३३ वर्षाच्या चुलत्याने तिला दमदाटी करुन जबरदस्तीने एक वर्षभर तिच्याबरोबर वारंवार शारीरीक संबंध केला. तिचे ७० वर्षाचे आजोबाही तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करुन तिच्याशी शारीरीक चाळे करीत असत. त्यानंतर एप्रिल २०१८ मध्ये ती पुण्यात आईवडिलांकडे आली. तेव्हा तिने आपल्यावरील या अत्याचाराची माहिती चिठ्ठी लिहून वडिलांना कळविली. त्यानंतर तिचे वडिलच तिची आई बाहेर असताना तिच्यावर अत्याचार करु लागले. ५ नोव्हेबर २०२२ रोजी त्याने तिच्या आईला काही कारणास्तव बाहेर पाठवून तिच्यावर अत्याचार केला. इतकी वर्षे अत्याचार सहन करत आलेल्या या मुलीने कॉलेजमधील एका कार्यक्रमात समुपदेशकापुढे आप बिती सांगितली. त्यानंतर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वडिलांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदुम तपास करीत आहेत.