भिगवण (पुणे) : मदनवाडी ग्रामपंचायत हद्दीत एका ४० वर्षीय महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली. मंगळवारी (ता. ०६) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
वैशाली कल्याण काळे (वय ४०, रा. मदनवाडीची भकासवाडी, ता. इंदापूर) असे मृतदेह आढळून आलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मयत महिलेची बहीण शालन प्रताप काळे (रा. मदनवाडीची भकासवाडी, ता. इंदापूर) यांनी भिगवण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. ०५) संध्याकाळच्या सुमारास वैशाली काळे ही जेवण घेऊन येते, असे म्हणून घराबाहेर गेली होती. ती रात्री खूप उशीर झाला तरीही परत आली नाही. मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तिचा शोध घेतला असता मदनवाडी गावच्या हद्दीत व्यंकटेश लॉन्ससमोरील वीटभट्टीच्या बाजूला शरीर अर्धवट जळालेल्या अवस्थेत वैशाली आढळून आल्या. पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय भिगवण येथे नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. हा घातपात आहे की इतर काही याबाबतचा तपास भिगवण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विनायक द्डस पाटील हे करीत आहेत.