नारायणगाव : राज्यासहित पुणे जिल्ह्यात सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहर आणि ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभंगानेही पुण्याला रेड अलर्ट दिला आहे. तर उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यातच पावसामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातही दरड कोसळणे, झाडापडी, घरे कोसळणे अशा घटना घडू लागल्या आहेत. जुन्नर तालुक्यातील गोद्रे गावात एक तरुण पाण्यातून वाहत गेल्याची घटना घडली आहे.
जुन्नर तालुक्यातील पश्चिम गोद्रे येथील ओढ्याला आलेल्या पुरा मुळे एकनाथ सोपान रेंगडे (रा. गोद्रे , ता. जुन्नर) हा व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. पुढे वाहत जाऊन काही अंतरावर तो मिळून आला आहे. या व्यक्तीच्या पायाला मार लागला असून त्याची प्रकृती स्थिर आहे. गोद्रे येथे पुल बांधण्यात यावा अशी मागणी अनेक वर्षांपासून होता आहे. नुकताच पूल मंजूर झाला असून त्याचे भूमिपूजन ही झाले आहे. मात्र प्रत्यक्षात पुलाचे काम सुरू झाले नसल्याने नागरिकांना धोकादायकरित्या प्रवास करावा लागत आहे.