पुणे : पोलिस चौकीत तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत मैत्री केली. त्यानंतर मुलाला व पतीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून पोलीस हवालदाराने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याविरुद्ध पोलिस हवालदाराने खंडणीची तक्रार केली असून त्यात बलात्काराचा खोटा अर्ज देऊन बदनामी करण्याची धमकी देऊन १ लाख रुपये खंडणी घेतल्याचा आरोप केला आहे.
पोलीस हवालदार राहुल अशोक मद्देल (वय ४२, रा. नाना पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्याची नाव आहे. हवालदार राहुल मद्देल हा सध्या हडपसर पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०१६ ते ८ डिसेबर २०२१ दरम्यान घडला आहे. याबाबत एका ४० वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या शिवराणा प्रताप पोलीस चौकीमध्ये तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या. तेथे राहुल मद्देल हा ड्युटीवर होता. त्याने फिर्यादीसोबत ओळख करुन मैत्री केली. त्यानंतर त्यांच्या मुलास व पतीस खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवून फिर्यादीला खराडी येथील लॉजमध्ये तसेच इतर ठिकाणी नेऊन त्यांच्याशी शरीर संबंध केले. तसेच फिर्यादीकडून वारंवार पैसे घेतले आहेत. फिर्यादी यांची समाजात बदनामी केली आहे. या प्रकरणील पोलीस उपनिरीक्षक मुळुक तपास करत आहेत.याविरोधात मुद्देल याने खंडणीची फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी महिला, तिचा पती व आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार विडी कामगार वसाहतीत २० जानेवारी, २१ जानेवारी व २२ मे २०२३ रोजी घडला आहे. महिलेने फिर्यादीशी ओळख वाढवून मैत्री केली. त्यानंतर घर खरेदी व इतर कारणासाठी वेळोवेळी २ लाख ३५ हजार रुपये घेतले़. फिर्यादी यांनी पैसे परत मागितले, असता फिर्यादीविरुद्ध महिलेने बलात्काराचा खोटा तक्रार अर्ज देऊन गुन्हा दाखल करण्याची, बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच नोकरी घालवण्याची धमकी देऊन फिर्यादीकडून १ लाख रुपये गुगल पेद्वारे घेतले. त्यानंतर पुन्हा फिर्यादीविरुद्ध तक्रार अर्ज करुन अर्ज परत घेण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.