पुणे : परदेशातील कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट या पदावर नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून एका व्यक्तीची फसवणूक केल्याचा प्रकार कोथरूड परिसरात घडला. याप्रकरणी पृथ्वीराज सिंह, अविनाश मिश्रा आणि प्रवीण गुप्ता यांच्यावर अलंकार पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सचिन मुकुंद पंडित (वय - ५१, रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार हा प्रकार २४ एप्रिल ते ५ मे २०२३ दरम्यान घडला. फिर्यादी पंडित यांना आरोपींनी अमेरिकेतील एका नामवंत कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट पदावर नोकरी लावून देतो असे सांगितले. त्यासाठी वेगवेगळ्या नंबरवरून संपर्क साधून बनावट ईमेल आयडी वरून ऑफर लेटर पाठवत पंडित यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर रजिस्ट्रेशन फी, कन्सल्टिंग फी भरावी लागेल अशी कारणे सांगून तब्बल १ लाख २७ हजार रुपये उकळले. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पंडित यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश तटकरे तपास करत आहेत.