राजगुरुनगर : बोगस रेशनिंग कार्ड दिल्या प्रकरणी खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे दहा लाख रुपयांची खंडणी देण्याची मागणी करण्यात आली आहे.खंडणी मागणारे आणि रेशनिंग कार्ड देणारे अशा दोघांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी असा तक्रारी अर्ज तहसीलदार ज्योती देवरे यांनी खेड पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार चौकशी सुरू केली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक पुनाजी जाधव यांनी दिली.तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार तहसील कार्यालयात पुरवठा निरिक्षक अधिकारी यांच्या माध्यमातून रेशनिंग कार्ड देण्यात येतात. त्यांच्या निर्गमित असलेल्या सन २०१५ ते २०२३ दरम्यानच्या रेशनिंग कार्ड मधील एक कार्ड एका लाभार्थीला मिळाले.ते देताना संबंधित अधिकारी यांनी ऑनलाईन चार हजार रुपये घेऊन ते कार्ड दिल्याची तक्रार एका व्यक्तीने केली. त्याचा तपास करीत असताना तहसीलदार देवरे यांना काही कार्ड गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. असा प्रकार घडला आहे असे समजताच संपर्क करणाऱ्या व्यक्तीने तहसीलदार देवरे यांना मोबाईलवर मेसेज करून प्रकरण मिटवायचे असेल तर दहा लाख रुपये द्या असा तगादा लावला.तहसीलदार ज्योती देवरे यांनी प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी यासाठी सबंधित प्रकरणाबाबत खेड पोलिसात लेखी तक्रार दिली. त्यात खेड तहसील कार्यालयात असलेल्या पुनर्वसन व रोजगार हमी योजनेचे अव्वल कारकून सुनील किसन नंदकर यांच्या चौकशीची मागणी केली आहे.तसेच कार्ड धारक महेश लक्ष्मण नेहरे यांच्याही नावाचा समावेश करण्यात आला आहे.दरम्यान, हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी थेट तहसीलदारांकडे खंडणी मागण्यात आल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
खेडच्या तहसीलदार देवरे यांच्याकडे मागितली दहा लाखांची खंडणी; बोगस रेशनिंग कार्ड प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 7:27 PM