पुणे : कॅमेलीयन जातीचा दुर्मिळ सरडा आपल्या सह्याद्रीमध्ये आढळून येतो. कॅमेलीयन जातीचा हा सरडा अत्यंत दुर्मिळ समाजला जातो. त्याची माहिती इतरांना व्हावी म्हणून यंदा ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ श्रीकांत इंगळहळीकर यांनी त्यांच्या शेतामध्ये ‘कॅमेलीयन’ पॅडी आर्ट साकारले आहे. दरवर्षी ते भातशेतीमध्ये एक वेगळ्या प्राण्याची प्रतिकृती साकारत असतात.
गेल्या अनेक वर्षांपासून इंगळहळीकर हे आपल्या सिंहगड पायथ्याजवळील शेतामध्ये पॅडी आर्टचा प्रयोग राबवतात. हे आर्ट आपल्या देशामध्ये पहिल्यांदा त्यांनीच आणला. आतापर्यंत त्यांनी अतिशय वेगळ्या प्रकारच्या प्राण्यांची प्रतिकृती त्यात साकारली आहे. यंदा आफ्रिकेत आढळणारा कॅमेलियन सरडा साकारला असून, आपल्याकडे हा क्वचित दिसून येतो. साधारण सहा इंच लाब असलेला हा सारडा प्रामुख्याने झाडावर पहायला मिळतो. हिरव्या रंगाचा हा सरडा असून, रंग बदलणारा म्हणूनही त्याला ओळखले जाते. ज्या झाडावर हा सरडा असतो, त्या झाडाच्या पानाच्या रंगाप्रमाणे आपला रंग बदलतो. या सरड्याच्या गळ्यावर आणि पोटावर पांढर्या काटयांची ओळ दिसते. कॅमेलीयन सरड्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. हा सरडा पूर्णत: बिनविषारी असून तो केवळ स्वसंरक्षणार्थ हल्ला करतो. ही कलाकृती सिंहगड रस्त्यावर डोणजे गावाच्या थोडे अलीकडे असलेल्या पेट्रोल पंपा जवळील लेक्सॉन वाइंडर्स येथे पहायला मिळू शकते.
कॅमेलीयन दुर्मिळ जातीचा सरडा
-रंग बदलण्यामध्ये तरबेज
-लांबी साधारण सहा इंच-बिनविषारी जातीचा सरडा
-स्व:संरक्षणार्थ हल्ला करतो
दहा वर्षांपासून पॅडी आर्ट !
इंगळहळीकर हे गेल्या ८ वर्षांपासून पॅडी आर्ट उपक्रम राबवतात. यंदाचे दहावे वर्ष आहे. भातशेतीमध्ये ते ज्या प्राण्याचा आकार साकार करायचा आहे, त्यानूसार भाताच्या रंगाची लागवड करतात. त्यासाठी त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागते. संगणकावर अगोदर स्केच काढून मग प्रत्यक्षात शेतात प्रयोग राबवावा लागतो.
निसर्गाच्या कॅन्व्हासवर चित्र !
निसर्गाच्या कुशीत अनेक प्राणी, पक्षी, जीव राहतात. त्यांचे चित्र निसर्गाच्या ‘कॅन्व्हास’वर चितारण्याचा हा अनोखा प्रयोग इंगळहळीकर हे २०१६ पासून करत आहेत. यापूर्वी त्यांनी 'कृष्ण गरूड' किंवा 'ब्लॅक ईगल', गणपती, काळा बिबट्या, पाचू कवडा, चापडा साप, गवा, क्लोराॅप्सिस अशी चित्रे साकार केली होती.