पुणे: ‘मिलिसेकंद पल्सर’(एमएसपी) आपल्या सूर्याच्या वस्तुमानाच्या एक दशांश वजनाच्या अत्यंत कमी वस्तुमानाच्या साथीदार ताऱ्याभोवती अवकाशात फिरत आहे. हा ‘एमएसपी’ त्याचा साथीदार नष्ट करण्याच्या प्रक्रियेत आहे. हा गुणधर्म भारतीय खगोलशास्त्रज्ञांना शोधण्यामध्ये यश आले आहे. अवकाशातील या घडामोडीचा शोध लागला असून, भविष्यात अधिक संशोधन झाल्यानंतर याविषयाचे महत्त्व जाणून घेता येईल.
नॅशनल सेंटर ऑफ रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स, (टीआयएफआर), पुणे येथील खगोलशास्त्रज्ञांच्या गटाने पीएच.डी. संशोधक अंकिता घोष आणि पीएच.डी. मार्गदर्शक प्रा. भास्वती भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली अद्ययावत जायंट मेट्रोवेव्ह रेडिओ टेलिस्कोप वापरून पीएसआर “जे १२४२-४७१२” नावाचा एक दुर्मिळ प्रकारचा मिलीसेकंद पल्सर (एमएसपी) शोधून काढला आहे. संशोधक गटाला असे आढळले की, हा मिलिसेकंद पल्सर आपल्या सूर्याच्या वस्तुमानाच्या एक दशांश वजनाच्या अत्यंत कमी वस्तुमानाच्या साथीदार ताऱ्याभोवती फिरत आहे. या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, हा एमएसपी त्याचा साथीदार नष्ट करण्याच्या प्रक्रियेत आहे. हे दोन खगोलीय घटक एकमेकांभोवती कसे फिरतात यावर मुख्यतः लक्ष केंद्रित केलेले संशोधन 'ॲस्ट्रोफिजिकल' नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. शास्त्रज्ञांना असे वाटते की, MSPs हे जुने न्यूट्रॉन तारे आहेत. ज्यांना जवळच्या ताऱ्याकडून अधिकाधिक वेगाने फिरण्यासाठी चालना मिळते.
पल्सर म्हणजे काय ?
पल्सर हे विश्वाच्या अथांग अवकाशात दीपगृहांसारखे आहेत, ज्यांना वैश्विक दीपस्तंभ म्हणता येईल. अत्यंत वेगाने फिरत राहत पल्सर रेडिओ प्रारण उत्सर्जित करत राहतात. एका सेकंदात पल्सर त्यांच्या अक्षाभोवती शेकडो फिरतात. यापैकी काही पल्सर हे प्रचंड वेगवान आहेत, जे प्रति सेकंद शेकडो वेळा फिरत आहेत. म्हणून ते मिलिसेकंद पल्सर (MSPs) आहेत.
काही मिलिसेकंद पल्सर प्रणालींमध्ये, पल्सर आणि सहचर तारा यांचे अत्यंत निकटच्या कक्षेत फिरणे खगोल संशोधकांच्या दृष्टिकोनातून काहीसे मनोरंजक आहेत. मिलिसेकंद पल्सरमधून येणारी तीव्र ऊर्जा त्याच्या खगोलीय घटक साथीदाराची सामग्री काढून टाकू शकते. जी पल्सरवरील रेडिओ प्रारण संकेतांना अवरोधित करू शकते, ज्यामुळे ग्रहणसदृश्य घडामोड आकाराला येते. ही घडामोड दोन कोळी कीटकांसारखी असते. ज्यामध्ये कोळी कीटक एकप्रकारे त्यांचा सोबती खातात. म्हणून मिलिसेकंद पल्सर प्रणालींमध्ये दोघांना 'अल्ट्रा-लाइट साथीदार' आणि ‘रेडबॅक’ अशी नावे दिली आहेत.