केरळच्या कोरोना पार्श्वभूमीवर राज्यात वैद्यकीय सुविधांचा आढावा
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: December 19, 2023 09:50 PM2023-12-19T21:50:52+5:302023-12-19T21:51:16+5:30
आरोग्य विभागाने राज्यातील १२६४ रुग्णालयांमधील वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला.
ज्ञानेश्वर भोंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: केरळमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच कोरोना विषाणूचा उपप्रकार असलेल्या जे एन १ या विषाणूचा पहिला रुग्णही केरळमध्ये आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाने राज्यातील १२६४ रुग्णालयांमधील वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला.
केरळमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील वैद्यकीय सुविधांचा आणि रुग्णालयांचा आढावा घेतला आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये फ्लूसदृश आजारांच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच सर्वेक्षणामध्ये आढळून फ्लूसदृश रुग्णांची करोना तपासणी कराव्यात. त्याचबरोबर सर्व जिल्ह्यांमध्ये करोना तपासण्यांची संख्या वाढण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
केरळमध्ये महिलेला लागण
केरळमध्ये एका ७९ वर्षीय महिलेला जेएन १ या विषाणूचा संसर्ग झाला होता. ही महिला यातून बरी झाली आहे. जेएन १ हा ओमिक्रॉन विषाणूचा उपप्रकार आहे. यामुळे विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणे दिसून येत आहे. त्यामुळे नागिरकांनी भिती बाळगू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. राज्यात सद्यस्थितीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण संख्येच्या वेळेस लागलेल्या ऑक्सिजन क्षमतेपेक्षा दुप्पटीने ऑक्सीजन उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
आढावा घेण्यात आलेली रुग्णालये
रुग्णालयांचा प्रकार - संख्या
- सरकारी रुग्णालय : ६५५
- खासगी रुग्णालये : ५७५
- खासगी वैद्यकीय महाविद्यालये : १४
- सरकारी वैद्यकीय महाविद्यालये : १४
- अन्य रुग्णालये : ६
- एकूण : १२६४
---
उपलब्ध सुविधा आणि साहित्य
- आयसोलेशन बेड : ६३६७५
- ऑक्सिजन बेड : ३३४०४
- आयसीसू बेड : ९५२१
- व्हेंटीलेटर बेड : ६००३
- एकूण उपलब्ध डॉक्टर : २३७०१
- कोरोना संदर्भात प्रशिक्षित डॉक्टर : २२३३०
- उपलब्ध परिचारिका : २५५९७
- प्रशिक्षित परिचारिका : २२३२४
- आरोग्य कर्मचारी : १०२३६
- प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी : ९१०१
- आयुर्वेदिक डॉक्टर : ८२५८
- प्रशिक्षित आयुर्वेदिक डॉक्टर : ७९९