पिंपरी : किरकोळ कारणावरून दोघांनी एका रिक्षा चालकाला आणि त्याच्या नातेवाईकाला मारहाण केली. तसेच चालकाच्या खिशातील रोख रक्कम आणि मोबाईल फोन काढून घेतला. ही घटना सोमवारी (दि. ८) रात्री चोरी चौक, पूर्णानगर, चिखली येथे घडली. बालाजी भानुदास गायकवाड (वय ५४, रा. घरकुल चिखली) यांनी या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदित्य आडे, संजय मरगुडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे नातेवाईक पूर्णानगर येथे एका मेडिकल दुकानात औषध गोळ्या घेण्यासाठी रिक्षा घेऊन गेले. मेडिकल समोर थांबलेल्या आदित्य याने बालाजी यांना केएसबी चौकात सोडण्यास सांगितले. त्यासाठी बालाजी यांनी नकार दिला. त्याचा राग येऊन संजय याने बालाजी यांच्या डोक्यात पाण्याची बाटली मारली. तसेच लपवून ठेवलेला कोयता काढून बालाजी यांच्या डोक्यात मारत जखमी केले.
आदित्य याने बालाजी यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांच्या खिशातील ३ हजार ३०० रुपये रोख रक्कम आणि पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतला. तसेच रिक्षाची चावी काढून फेकून दिली. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांचे नातेवाईक आले असता त्यांनाही आरोपींनी मारहाण करून शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.