बावधन (पुणे) : रस्त्यावर थांबलेल्या डंपरला विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकाने पाठीमागून जोरदार बस दिल्याने झालेल्या अपघातात पाच मुले जखमी झाली असून त्यातील दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाली आहेत. हे सर्व विद्यार्थी चार ते पाच वयोगटातील आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास बावधन येथील चांदणी चौकातील भुयारी मार्गावर घडला.
श्रावण अशोक मुंडे (वय ५), रितिका दिनेश दाभाडे (वय ५ दोघेही रा. साईराज रेसिडेन्सी, पौड रस्ता, भूगाव, ता. मुळशी) अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलांची नावे आहेत. तर रिक्षाचालक नामदेव गोळे यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
याबाबत बावधन पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चांदणी चौकातून भूगावला जाणाऱ्या भुयारी मार्गावर हायवा डंपर (एमएच १२, यूएम ९९९६) हा पंक्चर झालेला होता, त्याचा ड्रायव्हर आणि क्लिनर त्या गाडीचे चाक बदलत होते. त्याचवेळी पाठीमागून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाने (एमएच १२, आरपी ९१९६) जोरदार धडक दिली. त्यात रिक्षाच्या टपाचा चेंदामेंदा झाला. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन ही रिक्षा मुंबई-बंगळुरू महामार्गावरून पौड मार्गावरून भूगावच्या दिशेने भुयारी मार्गातून जात होती. त्याचवेळी रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना रुग्णालयात हलवले. रिक्षामध्ये एमआयटी शाळेच्या प्री- स्कूलमधील पाच वर्षे वयोगटातील लहान मुले होती. या अपघातात पाच विद्यार्थी जखमी झाले. त्यातील दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. प्रथम यातील तीन विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना पालकांनी घरी नेले. तर दोन गंभीर जखमी झालेल्या मुलांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पिंपरी- चिंचवड सह पोलिस आयुक्त, सहायक आयुक्त हिरे, पोलिस उपनिरीक्षक गणेश खारगे यांनी भेट दिली.