पुणे : पहिल्या पत्नीच्या मृत्युनंतर वर्षभरात त्याने दुसरे लग्न केले़ दुसऱ्या महिलेबरोबर लग्न केले. पण, घर नावावर करुन देण्यासाठी होत असलेल्या त्रासातून ज्येष्ठ नागरिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. विलास गेणबा लगड (वय ६२, रा. लक्ष्मी कॉलनी, विठ्ठलनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. गळफास घेत असल्याचा व्हिडिओही त्यांनी रेकॉर्ड केल्याचे आढळून आले आहे.
याबाबत त्यांचा मुलगा सागर विलास लगड (वय ३२) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुजात गुरव (वय ५०) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हडपसरमधील १५ नंबर चौक येथील किग्ज लॉज येथे सोमवारी दुपारी घडला.
अधिक माहितीनुसार, विलास लगड यांची पहिली पत्नी ललिता लगड यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर गेल्या वर्षी अचानक विलास लगड यांनी सुजाता गुरव हिच्याबरोबर लग्न केले. त्यांचा मुलगा फिर्यादी याने त्यांना वरच्या मजल्यावर राहण्यास फ्लॅट दिला. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी सुजाता हे घर आपल्या नावावर करण्यासाठी त्रास देऊ लागली. या त्रासाला कंटाळून विलास लगड हे मे २०२३ मध्ये घरातून निघून गेले होते. पोलिसांनी त्यांना शोधून परत आणले होते. ते दुसरीकडे एकटेच रहात होते. घर नावावर करुन देण्यावरुन त्यांच्यात गेल्या आठ दिवसांपासून वादावादी झाली होती. विलास लगड यांनी किग्ज लॉज येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मोबाईल पाहिला असता त्यात त्यांनी आपण सुजाता गुरव हिच त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. माझ्या मृत्युला जबाबदार फक्त सुजाता गुरवच आहे, अशी चिठ्ठी लिहिली होती. तसेच मोबाईलमध्ये ते आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केल्याचे आढळून आले.