पुणे : तृतीयपंथीयांच्या आरोग्यविषयक समस्या वेगळ्या आहेत. त्यासाठी ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांच्या उपचारासाठी अकरा मजली इमारतीत एक स्वतंत्र वॉर्ड सुरू केला आहे. यामध्ये सुरुवातीला ८ खाटांची व्यवस्था केली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते याचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले.
याआधी मुंबईतील जे. जे. रुग्णालयाअंतर्गत असलेल्या जी. टी. रुग्णालयात वॉर्ड नंबर १३ हा तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्रपणे दिला आहे. आता, ससूनमध्येही त्यांना स्वतंत्र उपचार मिळतील. वॉर्डला संलग्न स्वतंत्र प्रसाधनगृह, विशेष ओपीडी, तपासणी आणि उपचारासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात येणार आहे. तृतीयपंथीयांच्या बाह्यरुग्ण विभाग, वैद्यकीय तपासणी, चाचणी, अॅडमिट करून घेण्याची सोय अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
''तृतीयपंथी रुग्णांना सन्मानाची वागणूक मिळावी, अशा सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. त्यांना सर्व प्रकारच्या तपासण्या, औषधोपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत, अशी माहिती ससूनचे अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी दिली.