पुणे/किरण शिंदे: पुण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राहिलेले श्याम देशपांडे यांचा भाजप मध्ये प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप चे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित हा प्रवेश केला आहे.
देशपांडे हे पुणे महापालिकेचे तीन वेळा नगरसेवक राहिलेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी २०२२ मध्ये मुंबईतील एका भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्याने देशपांडे यांनी नाराजी व्यक्त केली होती. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांची मे २०२२ मध्ये हकालपट्टी केली होती. देशपांडे हे २०००-२०१२ या कालावधीत कोथरूड भागातून नगरसेवक होते. तर २००८-०९ मध्ये त्यांनी महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्षपद देखील भूषवले होते. आता भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना कोणती जबाबदारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना बंडानंतर भानगिरे यांनीही शिवसेना सोडली
पुण्यातील सलग तीनवेळा सेनेचे नगरसेवक राहिलेले प्रमोद भानगिरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला होता. उद्धव ठाकरे यांच्या सेनेला सोडचिठ्ठी देणारे आणि शिंदे यांना पाठिंबा देणारे भानगिरे हे पुण्याचे पहिले माजी नगरसेवक ठरले होते. पुणे महापालिकेत 2017 ते 2022 पर्यंत शिवसेनेचे 10 नगरसेवक होते. त्यानंतर आता देशपांडे यांनी भाजपात प्रवेश केला आहे.