घोडेगाव : गंगापुर खुर्द गावच्या गाडेकरवाडी ( ता.आंबेगाव) येथील वरसुबाई मंदिराजवळील ओढ्यावर खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या अंजली उर्फ पुनम अरुण काळे (वय वर्षे १५) आणि आर्यन उर्फ डीगु अरुण काळे (वय वर्षे ११) या बहीण भावाचा पाण्यात पडून मृत्यू झाला आहे. ही दोन्ही मुले गंगापूर खुर्द येथील हनुमान विद्यालयात अनुक्रमे ९ वी व ५ वीच्या वर्गात शिकत होती. घरातील दोन्ही मुलांच्या अशा अचानक जाण्याने काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गंगापूर खुर्द गाडेकरवाडी (ता.आंबेगाव) येथील अंजली उर्फ पुनम अरुण काळे आणि आर्यन उर्फ डीगु अरुण काळे हे दोघे गुरुवार (ता.३) रोजी सकाळी गावाजवळ असलेल्या वरसुबाई मंदिराजवळील ओढ्यावर खेकडे पकडण्यासाठी गेले होते. ते संध्याकाळ पर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरु केला असता ओढ्यातील पाण्यात या दोन्ही मुलांच्या बॉडी आढळून आल्या.
पुढील उपचारासाठी त्यांना घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता येथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ता. ३ ऑगस्ट रोजी पाण्यात पडून या मुलांचा मृत्यू झाला असून घोडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर वागज हे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.