पुणे/किरण शिंदे : नववर्षाचा जल्लोष सुरू असतानाच पुण्यातील बाणेर परिसरात अंगाचा थरकाप उडवणारी एक घटना उघडकीस आली आहे. खानावळ बंद असल्याने जेवण करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा हात तोडण्यात आलाय. आणि हा सर्व प्रकार घडलाय अवघ्या शंभर रुपयांसाठी. पुणेपोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली.
चोवीस वर्षाचा आशुतोष अर्जुन माने हा मूळचा अहमदनगरचा आहे. शिक्षणानिमित्त सध्या तो पुण्यात स्थायिक झाला आहे. अर्जुन सध्या इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. संपूर्ण जग नवीन वर्षाचं स्वागत करण्यात व्यस्त असताना अर्जुनच्या आयुष्यात मात्र एक भयानक घटना घडली. 31 डिसेंबरच्या रात्री खानावळ बंद असल्याने अर्जुन मित्रांसोबत जेवण करण्यासाठी बाहेर गेला होता. जेवण झाल्यानंतर नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बाणेर पाषाण रस्त्यावरील साई चौकात ते थांबले होते. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास चार आरोपी त्यांच्या जवळ आले. सुरुवातीला हॅपी न्यू इयर म्हणण्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपींनी अर्जुनकडे 100 रुपयांची मागणी केली. मात्र अनोळखी असलेल्या लोकांना पैसे देण्यासाठी अर्जुने नकार दिला. यातूनच वाद निर्माण झाला आणि आरोपींनी अर्जुनच्या हातावर कुऱ्हाडीने वार केले. यामध्ये अर्जुनच्या हाताचा पंजा तुटून खाली पडला. या घटनेत एकूण चार आरोपी आहेत. यातील तीन आरोपी अल्पवयीन आहेत. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.