पिंपरी : मतदानाच्या पूर्वसंध्येला चिखलीत गोळीबाराची घटना घडली. यामुळे खळबळ उडाली. या घटनेला राजकीय किनार आहे का, अशी चर्चा होत असतानाच पोलिसांनी संशयितांना अटक केली. हा प्रकार केवळ व्यावसायिक वादातून असल्याचे तसेच याला कोणतीही राजकीय किनार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
हर्षल सोनवणे (रा. जाधववाडी, चिखली), शामलिंग चौधरी (रा. मोशी), कीर्तीकुमार लिलारे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अजय सुनील फुले (१९, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अजय फुले आणि हर्षल सोनवणे या दोघांचे जाधववाडी परिसरात गॅस शेगड्या दुरुस्तीची दुकाने आहेत. एकमेकांच्या दुकानातील गिऱ्हाईक तोडण्यावरून त्यांच्यात वाद होते. १२ मे रोजी हर्षल याने वाद मिटविण्यासाठी अजय यांना बोलावून घेतले. चर्चा करत असताना हर्षलने पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी अजय यांच्या दंडाला लागून ते जखमी झाले. तसेच हर्षलने झाडलेली एक गोळी त्याचाच साथीदार कीर्तीकुमार याच्या मानेला लागली. एक संशयित जखमी झाला असल्याने त्याला रुग्णालयात दाखल केल्याचा अंदाज बांधून चिखली पोलिसांनी कीर्तीकुमार याची माहिती डॉक्टरांच्या सोशल मीडिया ग्रुपवर पाठवली. मोरवाडी येथील एका खासगी रुग्णालयात संबंधित संशयित उपचार घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खासगी रुग्णालयात धाव घेत संशयित कीर्तीकुमार याची ओळख पटवली. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकने देखील या गुन्ह्यातील एका संशयिताला ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील संशयित शामलिंग चौधरी हा देहूरोड येथे पळून गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी देहूरोड परिसरातून त्याला ताब्यात घेतले.
गोळीबार करणारा मुख्य संशयित हर्षल सोनवणे हा गुन्हा केल्यानंतर पळून गेला होता. त्याने त्याचा मोबाईल फोन बंद केला होता. त्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हान होते. चिखली पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात हर्षल कोणत्या दिशेने गेला याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याचा माग काढला. पोलिसांनी नाणेकरवाडी चाकण येथून हर्षल याला ताब्यात घेतले.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरक्ष कुंभार, चिखलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, सहायक निरीक्षक उद्धव खाडे, उपनिरीक्षक महेश मुळीक, दत्तात्रय मोरे, पोलिस अंमलदार बाबा गर्जे, संदीप मसाळ, विश्वास नाणेकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.