बारामती : भूक, भय आणि भ्रष्टाचार ही जशी इंग्रजांची मानसिकता होती. तीच मानसिकता आज असल्याचे दिसते.आज मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे. शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. जनतेचा पैसा लुटून विशिष्ट लोकांना व मित्रांना वाटण्याचं काम जे केले जात आहे .त्यातून भ्रष्टाचार होत आहे. जी काही परिस्थिती आहे, ती इंग्रज राजवटी सारखीच आहे. ती कुणालाही नाकारता येत नाही. जीएसटीमुळे सर्वसामान्यांची लूट सुरु असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
बारामती येथे एका आयोजित कार्यक्रमानंतर पटोले पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पटोले यांनी भाजपवर टीका केली.पटोले पुढे म्हणाले, देशाची संविधानिक व्यवस्था वाचवणे व जनतेचे प्रश्न आज आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. भाजपने २०१४ व २०१९ च्या निवडणुकांवेळी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. भाजप मूळ प्रश्नांना बगल देत देशाला विकून देश चालवण्याचे काम करत आहे. यामुळे भविष्यात आर्थिक अराजकता निर्माण होण्याची भीती पटोले यांनी व्यक्त केली.
भाजपच्या वतीने सातत्याने महापुरुषांबाबत अवमान केला जात आहे. राज्यपाल महाराष्ट्राच्या दैवतांचे सातत्याने अपमान करत आहेत. अशा राज्यपालांना भाजप हटवत नाहीत. यातून त्यांची खरी मानसिकता लक्षात आली. भाजपाचे केंद्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली, असे वक्तव्य केले. त्यामुळे महापुरुषांवरून भाजपला आंदोलन करण्याचा अधिकार नसल्याचा टोला पटोले यांनी लगावला.