Manmohan Singh: "कसलाही बडेजाव नसलेला साधा माणूस", पुण्यातून नेत्यांनी मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 10:05 IST2024-12-27T10:03:04+5:302024-12-27T10:05:41+5:30

एक उच्च प्रतिष्ठेचेआणि नेते, महान संसदपटू, आणि 'भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार' म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख होती

a simple man with no greatness leaders from Pune pay tribute to Manmohan Singh | Manmohan Singh: "कसलाही बडेजाव नसलेला साधा माणूस", पुण्यातून नेत्यांनी मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली

Manmohan Singh: "कसलाही बडेजाव नसलेला साधा माणूस", पुण्यातून नेत्यांनी मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली

पुणे : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या कालावधीत भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यरत होते. भारतात अर्थक्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या डॉ. सिंग यांच्या निधनाने देशभर शोककळा पसरली आहे. पुण्यातूनही काँगेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी मनमोहन सिंग यांना  श्रद्धांजली वाहिली आहे. 

मी एक अतिशय विद्वान सहकारी गमावला

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंगजी यांच्या निधनाबद्दल मला अतिशय दु:ख झाले आहे. मी एक अतिशय विद्वान सहकारी गमावला आहे. माझ्या राष्ट्रपतिपदाच्या कार्यकाळात त्यांच्यासोबत प्रदीर्घकाळ काम करता आले. त्यांचे अफाट ज्ञान, अनुभव याची मला माझ्या राष्ट्रपतिपदाच्या कार्यात खूपच मोलाची मदत झाली होती. त्यांच्यासोबतच्या सहवासाच्या अनेक आठवणी आजही आहेत. ते एक उच्च प्रतिष्ठेचे नेते होते, महान संसदपटू होते. 'भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार' म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने आपल्या देशाने एक आदरणीय नेता गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. - प्रतिभाताई पाटील (माजी राष्ट्रपती) 

साधेपणाने, प्रामाणिकपणाने आणि दूरदृष्टीने ते एक महान नेते 

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. भारतीय राजकारण आणि अर्थव्यवस्थेला डॉ. मनमोहन सिंह यांनी नवी दिशा दिली. त्यांच्या साधेपणाने, प्रामाणिकपणाने आणि दूरदृष्टीने ते एक महान नेते बनले. त्यांचं योगदान देशाच्या कायम स्मरणात राहील. - खासदार मुरलीधर मोहोळ 

देशाचे शासन आणि सरकार या व्यवस्थेत महत्वाची भूमिका 

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग जी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग जी यांनी देशाचे शासन आणि सरकार या व्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावली. या शोकप्रसंगी आम्ही त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वर मृताम्यास सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, ही प्रार्थना. आमदार चंद्रकांत पाटील 

मोठ्या पदांवर काम करतानाही त्यांचा अंगभूत साधेपणा

राष्ट्रकुल स्पर्धांची तयारी सुरू असताना सन २००८ मध्ये पंतप्रधान मनमोहनसिंग पुण्यात आले होते. माझ्या विनंतीवरून त्यांनी ऐनवेळी कार्यक्रमात बदल करत सेनापती बापट रस्त्यावरील स्पर्धांच्या कार्यालयाला भेट दिली होती. २००४ ला मी काँग्रेसचा शहराध्यक्ष होतो. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांना बोलावले होते. काँग्रेस भवनमध्ये त्यांचा मोठा सत्कार केला होता. ते एकदम साधे होते. मोठ्या पदांवर काम करतानाही त्यांचा अंगभूत साधेपणा त्यांनी कधीही सोडला नाही. - मोहन जोशी, माजी आमदार.

देशांच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा घडविण्यात त्यांचा हातखंडा

मनमोहनसिंग अर्थमंत्री असताना आणि पंतप्रधान झाल्यावरही पुण्यात अनेकदा आले. कसलाही बडेजाव नसलेला एक अतिशय साधा माणूस असेच मी त्यांचे वर्णन करेल. ते जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ होते. अविकसित देशांच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा घडविण्यात त्यांचा हातखंडा होता. ते ओळखूनच नरसिंहराव यांनी त्यांच्या हातात देशाची सूत्रे दिली. माझा त्यांचा पुण्यात व दिल्लीतही संपर्क आला. रूढ अर्थाने ते राजकारणी नव्हतेच; पण तरीही अल्पावधीतच त्यांनी राजकारणातील काही गणिते आत्मसात केली होती. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. - उल्हास पवार, ज्येष्ठ काँग्रेस नेते

जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ हे वलय त्यांना होते

माझे वडील बॅ. विठ्ठलराव गाडगीळ व त्यांची चांगली मैत्री होती. दिल्लीतील आमच्या घरी त्यांचे येणे-जाणे होते. एक आठवण मला सांगायला हवी. ते अर्थमंत्री वगैरे नव्हते त्यावेळी, पण जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ हे वलय त्यांना होतेच. वडिलांच्या काही फाईल्स त्यांच्याकडे तातडीने पोहाेचवायच्या होत्या. वडिलांनी मला सांगितले. मी आपला साध्या बस सर्व्हिसने गेलो. फाईल दिल्या व निघालो. कसा आलास? त्यांनी विचारले. मी सांगितले बसने! ते स्वतः त्यांची त्यावेळची मारुती-१०० घेऊन मला सोडवायला घरापर्यंत आले होते. अर्थमंत्री असताना पुण्यात ते एका कार्यक्रमासाठी आले होते. विमानतळावर उतरल्यावर ते लगेचच येरवड्यातील गुरुद्वारात गेले. तिथून कार्यक्रम स्थळी. मला त्यावेळी त्यांनी स्वतः बरोबरच ठेवले होते. गाडगीळ कुटुंबाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली. - अनंत गाडगीळ, माजी आमदार.

Web Title: a simple man with no greatness leaders from Pune pay tribute to Manmohan Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.