मनोज पोचट
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी स.प. महाविद्यालयाच्या मैदानात जाहीर भाषणात माझे नाव घेतले, त्यावेळी मी तिथेच होतो. ऐकले त्याचक्षणी मी आश्चर्य व आनंद अशा दोन भावनांच्या अत्युच्च शिखरावर गेलो. एका साधे ट्वीट केले होते; पण पंतप्रधानपदासारख्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीने ते पाहावे, त्याविषयी माझे नाव घेऊन बोलावे, अपेक्षा व्यक्त करावी हे सगळेच माझ्यासाठी विलक्षण अनुभव देणारे होते.
मी उद्योग क्षेत्रात काम करतो, माझी स्वत:ची कंपनी आहे. त्यामुळे देश, देशाची संस्कृती व एकूणच समाज, त्याची प्रगती याबद्दल माझे म्हणून काही विचार आहेत. माझे काम करताना मी त्याचा अवलंब करतोच; पण देश म्हणून विचार करताना सरकारकडूनही असे काही व्हावे, अशी माझी अपेक्षा असते. देशातील नेत्यांचे विचार, त्यांची भाषणे, सरकारचे कामकाज या सगळ्याचा मी देशाचा नागरिक म्हणून नेहमी त्याच दृष्टिकोनातून विचार करतो.
सन २०१३ च्या जुलै महिन्यात नरेंद्र मोदी फर्ग्यूसन महाविद्यालयात विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्यासाठी म्हणून आले होते. मी त्याही वेळी तिथे होतो. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांच्याभोवती प्रसिद्धीचे वलय नुकतेच फिरू लागले होते. या संवादाच्या कार्यक्रमाला येण्याआधी मोदी यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. ती माझ्या वाचनात आली होती. त्यात त्यांनी देशाच्या विश्वासाचा पाया खचला असल्याचे किंवा देशात विश्वासाची तूट असल्याचे वक्तव्य केले होते व ती वाढवण्यासाठी काय करता येईल यावर युवा वर्गाला सूचना करण्याचे आवाहन केले होते. मी काही सूचना केल्या होत्या.
तब्बल १० वर्षांनंतर मोदी पुण्यात येणार असल्याचे समजल्यावर मला साहजिकच त्यांच्या त्या पोस्टची व मी त्यावेळी केलेल्या सूचनांची आठवण झाली. दरम्यानच्या काळात मोदी देशाचे पंतप्रधान झाले होते. मागील नऊ वर्षांत त्यांनी पंतप्रधान म्हणून केलेले काम निश्चितच फार मोठे आहे. त्यांनी युवकांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत, उद्योजकांपासून ते सामान्य गृहिणींपर्यंत अनेक योजना जाहीर केल्या. त्या सर्व योजनांचे नाते भारतीय संस्कृतीबरोबर आहे, असे माझे मत आहे. उज्ज्वला गॅस असेल, जनधन असेल, शेतकरी विमा असेल, कोणतीही योजना घ्या, त्यात भारतीय संस्कृतीचा विचार केलेला दिसतो.
त्यामुळेच या योजनांना प्रतिसादही फार मोठा मिळतो, असे मला वाटते. मोदी पुण्यात येणार आहे, असे समजल्यानंतर मी ३१ जुलैला मला वाटणाऱ्या या सर्व गोष्टींविषयी एक ट्वीट केले. त्यात देशाच्या विश्वसनीयतेत आढळलेली तूट भरून येत असल्याचे मत व्यक्त केले होते. मला कल्पना नव्हती की मोदी या ट्वीटची दखल घेतील; पण त्यांनी ती घेतली. इतकेच नव्हे तर माझ्या नावासह माझ्या मताचाही उल्लेख करत देशाच्या विश्वसनीयतेची तूट भरूनच निघाली नाही तर त्यात वाढ झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात जगामध्ये देशाच्या विश्वसनीयतेचा ब्रॅंड व्हावा, अशी माझी आता इच्छा आहे. मोदी यांच्या नेतृत्वात तसे नक्की होईल, असा मला आता विश्वास आला आहे.