पुणे : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी भाजपवर देशात हिंसाचार, द्वेष आणि भीती पसरवल्याचा आरोप करीत ‘भाजपचे हे लोक हिंदू नाहीत’ असे वक्तव्य केले. त्याला सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार विरोध केला. देशातही त्यानंतर ठिकठिकाणी भाजपने आंदोलने केली. पुण्यात काँग्रेस भवनासमोरही भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले. यावेळी त्याठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने होते. पोलिसांनी मध्यस्थी करून जमावाला शांत केले.
राहुल गांधी यांनी हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्याचे सगळीकडे पडसाद उमटू लागले आहे. सत्ताधारी पक्षातील मंत्री, नेते यांनी या विधानाचा निषेधही केला आहे. विविध शहरात भाजपकडून आंदोलने करण्यात आली आहेत. तसेच आज पुण्यातही या वक्तव्याचे पडसाद उमटताना दिसून आले. पुण्यातील काँग्रेस भवनासमोरच भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले. नेमकं त्यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते भवनात होते. त्यांनीसुद्धा घोषणाबाजी करत उत्तर देण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये धरपकड होण्याइतपत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मध्यस्थी करत जमावाला शांत केले तर काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.
नेमकं काय म्हणाले होते राहुल गांधी
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना राहुल म्हणाले की, हिंदू कधीही हिंसा करू शकत नाही, द्वेष आणि भीती कधीही पसरवू शकत नाही; परंतु भाजपने युवक, विद्यार्थी, शेतकरी, मजूर, मागासवर्गीय, महिला आणि अल्पसंख्याकांमध्ये भीती निर्माण केली; परंतु अल्पसंख्याक या देशाच्या पाठीशी खडकासारखे खंबीरपणे उभे आहेत. हा अहिंसेचा देश आहे, भीतीचा नाही. भगवान शिव म्हणतात- घाबरू नका, घाबरवू नका. ते अहिंसेबद्दल बोलतात. जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते २४ तास हिंसा आणि द्वेषावर बोलतात. तुम्ही (भाजप) हिंदू असूच शकत नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.