पिंपरी : कर्वेनगर भागात राहणाऱ्या एका तृतीयपंथीला जळगावमधील एकाने आपल्या पोटच्या ६ दिवसांच्या मुलीला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्वेनगर येथील संभाजीनगर येथे राहणाऱ्या दोन तृतीयपंथींनी स्वत:च्या फायद्यासाठी या मुलीला विकत घेतले.
दत्तक घेण्यासाठी लागणारी कोणतीही कागदपत्रे न करता, तसेच दत्तक कायद्याच्या तरतुदीशिवाय केवळ मुलगी नको म्हणून या बालिकेला बापाने विकण्याचा निर्णय घेतला आणि पुण्यातील तृतीयपंथींनी तिला विकत घेतले होते. जळगाव येथील एकाला पहिल्या दोन मुली असताना, परत मुलगीच झाल्याने त्याने विक्री केल्याचे समोर आले आहे.
या तृतीयपंथींजवळ हे बाळ २१ ऑक्टोबर २०२१ ते २३ सप्टेंबर २०२२ पर्यंत होते. आता बाळाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलिसांनी जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. राणी खेडीकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना या मुलीबाबत माहिती दिली.
त्यांनी बालकल्याण समितीच्या सदस्या वैशाली गायकवाड, श्यामलता राव, पूर्वी जाधव, आनंद शिंदे यांच्याशी चर्चा करून या मुलीला सध्या एका संस्थेत तात्पुरते दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. गुन्हे शाखेने निर्दयी बापावर व खरेदी करणाऱ्यावर बालन्याय अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.