दौंड: येथील रेल्वे स्थानकात चेन्नई- मुंबई धावत्या रेल्वेतून पडून भाऊसाहेब शहानू देवकर (वय ४८, रा. शहापूर, ता. नेवासा, जिल्हा अहिल्यानगर) यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती हवलदार अरुण टिंगरे यांनी दिली. रविवार (दि.१२) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.
भाऊसाहेब देवकर हे चेन्नई येथून आपल्या घरी जाण्यासाठी चेन्नई -मुंबई एक्स्प्रेसने निघाले होते. दरम्यान, दौंड रेल्वे स्थानकात उतरून पुढे अहिल्यानगरला जाणार होते. परंतु चेन्नई -मुंबई एक्स्प्रेसला दौंड रेल्वे स्थानकात थांबा नव्हता. तेव्हा पाठीवर बॅग घेऊन धावत्या रेल्वे गाडीतून त्यांनी फलाट क्रमांक दोनवर गाडी सोडली असता, यावेळी ते फलाटवर पडले परंतु त्यांच्या पाठीला जड बॅग अडकवलेली असल्याने या बॅगेचा तोल गाडीच्या दिशेला गेला आणि भाऊसाहेब देवकर गाडीखाली रुळामध्ये सापडल्याने त्यांचा मृत्यू झाला. भाऊसाहेब देवकर हे अंदमान निकोबार येथे सैन्यात नाईक पदावर काम करत होते, ते सुटीनिमित्ताने आपल्या घरी निघाले होते. परंतु काळाने त्यांच्यावर झडप घातली. दौंड रेल्वे पोलिसांनी त्यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाइकांकडे सुपुर्त केला.