Maval Vidhan Sabha ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ येऊ लागल्याने महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून वादाची ठिणगी पडू लागली आहे. विद्यमान आमदार असलेल्या मतदारसंघांवर मित्रपक्षाचे नेतेही दावा सांगू लागल्याचं चित्र आहे. अशातच मावळ विधानसभा मतदारसंघावरून महायुतीत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण या मतदारसंघात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सुनील शेळके हे आमदार आहेत. मात्र हा मतदारसंघ पारंपरिकदृष्ट्या भाजपकडे राहिला असून ही जागा आम्हालाच मिळावी, अशी मागणी या मतदारसंघातील माजी आमदार बाळा भेगडे यांनी केली आहे.
मावळ मतदारसंघावर दावा करताना बाळा भेगडे यांनी म्हटलं की, "१९५७ ते २०२४ या काळात मावळ तालुक्याने आधी जनसंघ आणि नंतर जनता पार्टी व भारतीय जनता पार्टीचा सर्वाधिक वेळा आमदार निवडून दिला आहे. संघटनेच्या बळावर लोकप्रतिनिधी निवडणूक देण्याची राज्यभरात मावळ तालुक्याची एक आगळी-वेगळी ओळख आहे. त्यामुळे आमागी विधानसभा निवडणुकीतही परंपरागत आपला असणारा मतदारसंघ आपल्याला मिळावा, यासाठी आम्ही भाजप नेतृत्वाकडे आग्रहाची मागणी करणार आहोत," अशा शब्दांत भेगडे यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
२ ऑगस्टला होणार शक्तिप्रदर्शन
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मावळ भाजपकडून २ ऑगस्ट रोजी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी हा मेळावा आयोजित केला जाणार असला तरी या मेळाव्यामुळे महायुतीतील तणाव वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजपच्या या मेळाव्यावर आणि मतदारसंघावर दावा सांगण्याच्या भूमिकेवर या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ते याबाबत काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.