पुणे : दिग्दर्शक डाॅ. जब्बार पटेल आणि मी केव्हाही भेटलाे तरी एकमेकांशी खवचटच बाेलताे. कधी सरळ बाेललेले आठवत नाही. माझे सर्वाधिक भांडण जब्बारशीच होतात; कारण तो माझा सर्वात जवळचा मित्र आहे. भांडणानंतरही जी मैत्री टिकून राहते ती खरी मैत्री असते. तीच जब्बार आणि माझ्यात आहे, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते डाॅ. माेहन आगाशे यांनी व्यक्त केली. ‘घाशीराम कोतवाल’ नाटकातील माझ्या भूमिकेसाठी जी नजर लावायची होती तीदेखील जब्बारने घडवली, असेही ते म्हणाले.
चित्रपट, नाटक, मालिका, मानसोपचार, शिक्षण आदी क्षेत्रांत मनसोक्त मुशाफिरी करणारे जगन्मित्र पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त आशाय सांस्कृतिकतर्फे आयाेजित डॉ. मोहन आगाशे यांच्या दृक-श्राव्य प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. सिने-नाट्य कलाकार दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते डाॅ. आगाशे यांचा पुणेरी पगडी प्रदान करून विशेष सत्कार करण्यात आला. रेखा इनामदार साने यांनी आगाशे यांच्याशी संवाद साधला. व्यासपीठावर वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार उपस्थित होते.
डाॅ. आगाशे म्हणाले की, आपण कितीही चांगले कलाकार असलो आणि शंभर टक्के आपण रंगभूमीवर द्यायचे म्हटले तरी सहकलाकारांची अभिनय उंची गाठत नसेल तर तुमचाही परफॉर्मन्स मार खातो. सुदैवाने मला दिग्दर्शक, लेखक, सहकलाकर सर्व स्तरावर उत्तम साथ मिळाली. त्यातल्या त्यात विजय तेंडुलकर आणि जब्बार पटेल यांचा माझ्या कलाकार म्हणूनच्या प्रवासात सर्वाधिक प्रभाव आहे. तेंडुलकरांचे माझ्यासह अनेक लेखक कलाकारांवर ऋण आहेत. मला तेंडुलकरांचा सहवास मिळाला हे मी माझे भाग्य मानतो. एखाद्या भूमिकेकरिता एखाद्या कलाकाराचे नाव होते त्यात त्या एकट्या कलाकाराचे योगदान नसते तर त्यात सहकाऱ्यांचे योगदानदेखील तेवढेच महत्त्वाचे असते.
दिलीप प्रभावळकर म्हणाले की, राज्य मराठी नाट्य स्पर्धेसाठी तुल्यबळ स्पर्धक म्हणून आमच्या प्रेम कहाणी या नाटकासमोर ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक होते. स्पर्धक म्हणून त्यांचे नाटक पाहिल्यानंतर मी घाशीराम कोतवालच्या विषयापासून सादरीकरणापर्यंत सर्वार्थाने भारावून गेलो. घाशीरामला मिळालेला प्रतिसाद आणि स्टॅंडिंग ओव्हेशन पाहता हेच नाटक प्रथम क्रमांक पटकावेल याची खात्री झाली होती, परंतु प्रथम क्रमांक त्यांना आणि आम्हालाही नाही मिळाला. सुमारे २२ वर्षांनंतर कथा ‘दोन गणपतरावांची’ या नाटकाच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो. नंतर आम्हा दोघांची जोडीच जमली.
‘घाशीराम कोतवाल’ इतिहास घडवेल याची कल्पनाही नव्हती
रंगभूमीवर तुम्ही ज्या ताकदीने भूमिका साकाराल ते सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असते. त्या तुलनेत चित्रपटातील अभिनय हा संपादक, दिग्दर्शक आदींचा एकत्रित परिणाम असतो. घाशीराम कोतवाल करताना हे नाटक इतिहास घडवेल याची कल्पनाही नव्हती, असे प्रांजळ मतही डाॅ. माेहन आगाशे यांनी व्यक्त केले.