बारामती:बारामती शहरात इंंदापूर मार्गाला जोडणाऱ्या बाह्यवळण मार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने १७ मेंढ्या चिरडल्याची घटना घडली आहे. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले असून अपघात झालेला रस्त्यावरील वाहतुक थांबविण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी घटनास्थळी भेट देत अपघाताची पाहणी केली. डंपर (क्र. एम.एच. ११ सीएच ७५११) हा माळावरच्या देवीलगतच्या मार्गावरुन इंदापूर जोड रस्त्याकडे निघाला होता. यावेळी रस्त्यावरुन निघालेला डंपर मेंढ्या अक्षरशा: चिरडत पुढे जाऊन थांबला. रस्त्यावर मेंढ्यांचा चेंदामेंदा झाला आहे. संभाजी मोठे या मेंढपाळाच्या या मेंढ्या आहेत. सुमारे १७ मेंढ्या अपघातात चिरडल्याची माहिती मिळत आहे. याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. घटनास्थळी मेंढपाळ महिलेचा आक्रोश पाहून उपस्थितांची मने हेलावली.
भाजपचे अभिराज देवकाते हे तातडीने घटनास्थळी पोहचले. मेंढपाळांना नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय डंपर नेऊ दिला जाणार नसल्याची भूमिका देवकाते यांनी घेतली आहे. पोलीसांनी येथे एकेरी वाहतुक सुरु ठेवत पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. अपघातस्थळी बघ्यांची गर्दी वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.