सांगवी : माळेगाव -नीरा रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत शिक्षिकेच्या हाताला, डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यातच शिक्षिकेचा मृत्यू झाल्याचा दुर्दैवी प्रकार घडला आहे. माळेगाव बुद्रूक येथील ओद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या शिक्षिका संगीता संपत नारगे (रा. कारभारीनगर, कसबा, बारामती) यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
शनिवारी (दि. १५) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास माळेगाव येथे निरा- बारामती रस्त्यावर हा अपघात घडला. फिर्यादी संपत मारुती नारगे यांनी टेम्पोचालक किरण आनंद पाटील (रा. अवधान, जि. धुळे) याच्या विरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस ठाण्याच्या जवळच हा झाला होता. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत अपघाती शिक्षिकेला उपचारांसाठी बारामतीत हलविण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करून घेतले नाही.
शनिवारी त्या दुचाकीवरून (एमएच १२ एसएच ९७२२) बारामतीच्या दिशेने घरी येत असताना माळेगाव येथील मुथा पेट्रोल पंपाजवळील स्पीड ब्रेकरजवळ त्यांनी दुचाकीचा वेग कमी केला. यावेळी पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पो (एमएच १८ बीजी ८६९०) वरील चालक किरण आनंद पाटील याने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यातच शिक्षिका संगीता नारगे यांचा मृत्यू झाला. याबाबत माळेगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.