पुणे: केंद्र सरकारने दहा वर्षांपूर्वी काढलेल्या आधार कार्डांचे अद्ययावतीकरण सुरू केल्यानंतर महिनाभरापूर्वी जिल्ह्यात केवळ सव्वाचार हजार जणांनी आधार अपडेट केले होते. मात्र, त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तसेच विभागीय प्रशासनाने यात पुढाकार घेतल्यानंतर गेल्या २२ दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यात सुमारे १५ हजार जणांनी आधार अपडेट केले आहे. हीच संख्या सातारा जिल्ह्यात १७ हजारांच्या वर आहे.
केंद्र सरकारने मार्चमध्ये आधार अपडेट करण्याचे काम सुरू केले. त्यानुसार जिल्ह्यात तीस लाख जणांचे आधार अपडेट करणे शिल्लक होते. जिल्हा प्रशासनाने आधार अपडेट करण्याचे काम सुरू केल्यानंतर मार्चमध्ये त्याला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. या महिनाभरात केवळ ४ हजार २२६ जणांनीच आधार अपडेट केले. मात्र, त्यानंतर विभागीय स्तरावर तसेच राज्यस्तरावर आधार अपडेट करण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात २७६ मशीन उपलब्ध करून देण्यात आले. या मशीनद्वारे सुट्यांच्या दिवशी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्याला नागरिकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. परिणामी १ ते २२ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात १४ हजार ९६५ जणांनी आधार अपडेट केले.
विभागीय स्तरावरही या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असून पाचही जिल्ह्यांमध्ये अपडेट करण्याचे काम जोमाने हाती घेण्यात आले आहे. सातारा जिल्ह्याने यात आघाडी घेतली असून या जिल्ह्यात सर्वाधिक आधार अपडेट करण्यात आले. येथे १७ हजार ५७० जणांनी आधार अपडेट करून घेतले आहे. त्यामुळे विभागात सातारा जिल्हा सध्या अपडेट करण्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर पुण्याचा क्रमांक लागतो. सर्वात कमी आधार अपडेट कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ७ हजार ८०१ इतके झाले आहे.
महिनाअखेरीस विशेष शिबिरांचे आयोजन
आधार अपडेट करण्याचे काम निरंतर सुरू असून नागरिकांनीही आधार अपडेट करून घ्यावे असे आवाहन समन्वयक अधिकारी रोहिणी आखाडे यांनी केले आहे. त्यानुसार येत्या २९, ३० एप्रिल व एक मे रोजी आधार अपडेट करण्याचे विशेष शिबिर सबंध जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार आहे. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहनही आखाडे यांनी केले आहे.
विभागातील आधार अपडेट
पुणे १४९६५सातारा १४५७०सांगली ९२५२सोलापूर ८११९कोल्हापूर ७८०१