पुणे :पुणे शहराच्या हवेची गुणवत्ता खराब होत चालली आहे. देशातील प्रदूषित शहरात पुणे गणले जात आहे. याची गंभीरता लक्षात घेत पुणे महापालिकेने देखील गंभीरपणे पाऊल उचलले आहे. हवा प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने चार अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात येणार आहे. त्यावर सहाय्यक महापालिका आयुक्त यांचे नियंत्रण राहणार आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या आदेशांनुसार शहरामध्ये हवा प्रदूषण कमी करणे बाबत उपाययोजना व निर्देशपारित केले आहेत. त्यात सर्व सहाय्यक महापालिका आयुक्त सर्व सहाय्यक महापालिका आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली हवा प्रदूषण नियंत्रण करणेकामी हवा प्रदूषण नियंत्रण पथक स्थापन करण्यात यावे असे नमुद केले आहे. या पथकामध्ये उपअभियंता (स्थापत्य), आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता / बीट निरीक्षक एम.एस.एफ. जवान यांची नेमणूक करण्याचा उल्लेख आहे.
या पथकाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार काम करावे. दैनंदिनी केलेल्या कारवाईचा अहवाल गुगल शीटवर अद्ययावत करावा. जेणेकरून दैनंदिन अहवाल एकत्रित करून अतिरिक्त आयुक्त (ज) यांचेकडे सादर करावा. पालिका शाळामध्ये याबाबतचे अभिनव उपक्रम राबवावेत. तसेच जन संपर्क विभागाने व पर्यावरण विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाशी संपर्क साधून हवा प्रदुषणाशी संबंधित माहिती पुणे पालिकेच्या संकेतस्थळा वर प्रसिद्ध करावी, असे आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशात नमुद केले आहे.