पुणे : अपप्रवृतीविरुद्ध जनजागृती करणाऱ्या महिलेच्या गळ्यात चपलांचा हार घालून त्याचे चित्रीकरण करुन मारहाण करुन तो व्हिडिओ युट्युबवर प्रसारित करुन एका तृतीयपंथीने बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी बारामती येथील एका ४० वर्षाच्या महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सागर पोपट शिंदे ऊर्फ शिवलक्ष्मी संजय झाल्टे (रा. येवला) व तिच्या अकोट, इचलकरंजी, औरंगाबाद, कोल्हापूर येथील समर्थक अशा १० महिला व पुरुषांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना विश्रांतवाडी येथील चौधरीनगरमधील एका घराचे टेरेसवर २३ जून रोजी घडली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे एक यु ट्युब चॅनेल आहे. त्यामध्ये फिर्यादी या समाजातील अपप्रवृत्तीबद्दल जनजागृती करत असतात. महंत शिवलक्ष्मी आईसाहेब हा युट्युब चॅनेल सागर शिंदे या तृतीयपंथीचा आहे. शिवलक्ष्मी हा त्याचे चॅनेलवर अंधश्रद्धा पसरवणे, वयस्कर व्यक्तींना पाया पडायला लावणे, अशा चुकीच्या गोष्टी करत असल्यामुळे फिर्यादीने त्याच्याविरुद्ध स्वत:चे चॅनेलवर व्हिडिओ बनविला होता. त्याबद्दल शिवलक्ष्मी हिच्या बोलण्यावरुन फिर्यादी त्याबद्दल आरोपीची माफी मागितली होती. तसेच २३ जून रोजी दुपारी १२ वाजता त्या चौधरीनगर येथे गेल्या होत्या. त्यावेळी सागर शिंदे याने महिला व पुरुषांना बोलावून फिर्यादीला घराचे टेरेसवर बोलावले. तेथे तिला अडकवून ठेवले. शिवीगाळ करुन चपलाने व हाताने मारहाण केली. फिर्यादीच्या गळ्यात चपलांचा हार घालून या सर्व प्रकाराचा व्हिडिओ चित्रीकरण केले. ते यु ट्युब वर प्रसारीत करुन फिर्यादीची बदनामी केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.
शिवलक्ष्मी ही स्वत: किन्नर आखाडा महंत आहेत. तिचे यु ट्युब चॅनेल आहे. तिच्या व्हिडिओमध्ये छेडछाड करुन लिंग व वर्णभेदी टिप्प्णी, दमबाजी व शिवीगाळ केल्या प्रकरणी शिवलक्ष्मी हिने येवला शहर पोलीस ठाण्यात एप्रिल महिन्यात गुन्हा दाखल केला आहे. देशात तृतीयपंथी समुदायाच्या संरक्षणासाठी २०२० मध्ये पारित झालेला तृतीय पंथी अधिकार संरक्षण कायदा आल्यानंतर दाखल झालेला हा राज्यातील पहिलाच गुन्हा होता. हा प्रकार बारामतीत झाल्याने येवला पोलिसांनी तो अधिक तपासासाठी बारामती पोलिसांकडे वर्ग केला आहे.