पुणे : ससून रुग्णालयात हृदयाचे विविध प्रकारचे ऑपरेशन करण्यासाठी रुग्णांकडून ५० हजार ते काही लाख रुपये मागितल्याचा व घेतल्याचा प्रकार ‘लाेकमत’ने उघडकीस आणला. त्याची दखल घेत या प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. विनायक काळे यांनी वरिष्ठ डाॅक्टरांची त्रिस्तरीय चाैकशी समिती गठित केली आहे.
येथील ठरावीक डाॅक्टर शस्त्रक्रियांसाठी भुलीचे डाॅक्टर, ऑक्सिजनची गरज असल्याचे सांगून पैसे घेत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडेही ताेंडी प्राप्त झाल्या हाेत्या. रुग्ण लेखी तक्रार करायला धजत नाहीत, कारण त्यांचा रुग्ण तेथे ॲडमिट असताे. त्याच्यावर उपचार करून घेणे ही त्यांची प्राथमिकता असते.
‘लाेकमत’ने केला भांडाफाेड
गाेरगरीब रुग्णांच्या हतबलतेचा फायदा घेत येथील डाॅक्टरांकडून ‘नित्य’पणे पैसे मागितल्याचे समाेर आले असून, त्या पैशांच्या जीवावर ‘आनंद’ घेत हाेते. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. ससून प्रशासनालाही ताे माहीत आहे; पण मांजराच्या गळ्यात ‘ठाकूर’ शैलीत घंटा काेणी बांधायची म्हणून हे सर्व सुरू आहे. ससूनचे प्रशासन याबाबत माहीत असूनही झाेपेचे साेंग घेत आहेत. मात्र, गाेरगरीब रुग्णांची हाेणारी पिळवणूक आता तरी थांबायला हवी, यासाठी ‘लाेकमत’ने या प्रश्नाला वाचा फाेडली आहे.
वैद्यकीय शिक्षणमंत्री इकडेही लक्ष द्या!
वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री गिरीश महाजन आहेत. ससून हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत माेठे शासकीय रुग्णालय आहे. मंत्र्यांचे ससूनकडे लक्ष कमी झाल्याचे बाेलले जात आहे. त्यामुळे येथील घडी व्यवस्थितपणे बसण्यासाठी आता त्यांनाच जातीने लक्ष घालावे लागणार आहे.
रुग्णांवर दबाव
‘लाेकमत’ने रुग्णांकडे पैसे मागितल्याच्या प्रकरणाचा भांडाफाेड केला असता, सीव्हीटीएस विभागातील डाॅक्टरांनी मंगळवारी रुग्णांवर दबाव टाकत हाेते, पैसे घेतल्याप्रकरणी काेणाला काही सांगू नका, असे सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पैसे नसल्यास दाेन महिने वेटिंग
हृदयशल्यचिकित्सा विभागातील डाॅक्टरांकडून पैसे मागितल्यानंतर ज्या रुग्णांकडून पैसे मिळतात, त्यांनाच उपचार दिले जातात, अन्यथा त्यांना दाेन ते अडीच महिने शस्त्रक्रियेसाठी वेटिंग असल्याचे सांगत ताटकळत ठेवले जाते. त्यामुळे हे रुग्ण एक तर तेथून डिस्चार्ज घेतात, अथवा पैसे देऊन उपचार करून घेतात, असेही प्रकार घडत आहेत.
ससून या शासकीय रुग्णालयात हृदयासह सर्व प्रकारचे उपचार माेफत व्हायला हवेत. त्यासाठी महात्मा फुले जन आराेग्य याेजना आहे. हृदयाला लागणारे काही वैद्यकीय उपकरणे बाहेरून आणावी लागत असली, तरी त्याचा पुरवठा शासनाने करायला हवा. रुग्णांकडून त्याचे पैसे अजिबात घ्यायला नकाे. ही जबाबदारी अधिष्ठाता, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची आहे. शस्त्रक्रियेसाठी डाॅक्टरांकडून पैसे मागितले जात असतील, तर या प्रकरणाची निष्पक्ष चाैकशी व्हावी आणि दाेषींवर कठाेर कारवाई व्हायला हवी.
- डाॅ. अभिजीत माेरे, जन आराेग्य अभियान