पिंपरी : घराच्या परिसरात खेळत असलेला तीन वर्षीय मुलगा पावसाच्या पाणी असलेल्या खड्ड्यात पडला. त्याला त्याच्या आईने लागलीच काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. भोसरी येथील चक्रपाणी वसाहतीमध्ये सोमवारी (दि. १०) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली.
गणेश बालाजी मंजलवार, असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजलवार कुटुंबीय भोसरी येथील चक्रपाणी वसाहतीमध्ये राहत आहेत. त्यांच्या घराच्या परिसरात असलेल्या मैदानात खड्डे असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास चिमुरडा गणेश इतर मुलांसोबत खेळत होता. त्यावेळी तोल गेल्याने गणेश खड्ड्यात पडला.
गणेशसोबत खेळत असलेल्या मुलांनी त्याच्या आईला याबाबत माहिती दिली. आईने धावत जाऊन गणेशला खड्ड्याबाहेर काढले. त्यानंतर गणेशला उपचारासाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली. पोलिस उपनिरीक्षक सुहास गाडे तपास करत आहेत.