पुणे : किल्ले सिंहगड परिसरात वाघ दिसल्याची चर्चा आहे. एका जोडप्याने वाघ पाहिल्याने हा विषय समोर आला. वाघ पळून गेला असे त्यांनी नमूद केले आहे. पण वाघ कधीही समोर आल्यानंतर लगेच पळून जात नाही. तो बिबट्या सारखा भित्रा नाही. गेल्या शंभर वर्षांत तरी सिंहगड परिसरात वाघाची नोंद नाही. त्याचा अधिवासही तिकडे नाही, असे वन्यजीव संशोधक प्रा. संजीव नलावडे यांनी सांगितले.
कोयना अभयारण्यात वाघ आहेत. तेथून राजगड, रायरेश्वर, महाबळेश्वर मार्गे सिंहगड परिसरात वाघ येत असेल, तर तो अनेक ठिकाणी दिसला असता. कुठे तरी त्याने शिकारी केल्या असत्या. पण तसे काहीच कुठे नोंद आढळून येत नाही आणि थेट सिंहगड परिसरात वाघ दिसला, तर तो अचानक कुठून येईल ? गेल्या शंभर वर्षात तरी येथे वाघ आल्याची नोंद नाही. बरेचजण बिबट्या किंवा तरसाला वाघ म्हणतात. जोपर्यंत ठोस पुरावा दिसत नाही, तोपर्यंत वाघ असल्याचे ठाम सांगता येत नाही, असे प्रा. नलावडे म्हणाले.
सिंहगड परिसरात किंवा कोयना पासून येताना त्याला मध्ये कुठेच त्याचे खाद्य उपलब्ध नाही. मग तो काहीही न खाता सिंहगडला येऊ शकत नाही. वाघ ३५० किलोमीटरपर्यंत चालत जाऊ शकतो. तशा नोंदी आहेत. एवढ्या लांब तो फिरू शकतो. जयंतराव टिळक यांच्याशी मी बोललो आहे. ते शिकार करायचे. परंतु, त्यांनाही कधी सिंहगड परिसरात वाघ आढळून आला नाही. १९३२ साली एनडीए परिसरात था‘मस ग्रे यांनी वाघ पाहिल्याची नोंद आहे, असे नलावडे यांनी सांगितले.
ठशांवरून स्पष्ट होईल !
सध्या पाऊस आहे. सिंहगड परिसरात चिखल झालेला असेल, त्यामुळे पावसाने ठसे नीट उमटू शकणार नाहीत किंवा मिळू शकणार नाहीत. त्या ठशांवरून तो बिबट्या की वाघ ते समजू शकेल. ते जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तोपर्यंत वाघ दिसला असे म्हणता येणार नाही, असे प्रा. नलावडे म्हणाले.
माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टंग यांनी सुमारे २२५ वर्षांपूर्वी पेशव्यांना वाघाची शिकार करू द्यावी, अशी परवानगी मागणारे पत्र लिहिलेले आहे, त्याची नोंद पहायला मिळते. पण सिंहगड परिसरात वाघाची काही नोंद नाही.