राजगुरुनगर (पुणे) : चांडोली (ता. खेड ) येथे खेड पोलिसांनी छापा टाकून एक कंटेनर व गुटख्यासह एकूण २८ लाख ८२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली. याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि. ३) रात्रीच्या सुमारास चांडोली (ता. खेड) येथे पुणे-नाशिक महामार्गावर भारत पेट्रोल पंपाचे समोर एक कंटेनर उभा असून त्यामध्ये गुटखा भरून आला असल्याची माहिती पोलीस हवालदार सुनिल बांडे यांना मिळाली होती.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, ज्ञानेश्वर राऊत, पोलीस हवालदार संतोष मोरे, निखील गिरीगोसावी, अर्जुन गोडसे कोमल सोनूने यांनी सापळा रचून छापा घातला. त्यावेळी टाटा कंपनीचा टेम्पो गाडी नंबर एम. एच. १४.के.ए. १२८६ मध्ये एकूण १३ लाख ,८२ हजार रुपये किंमतीचा आर. एम. डी तंबाखू पान मसाला बेकायदा विक्रीसाठी आणलेला असल्याचा मिळून आला.
आरोपी अर्जून विठ्ठल नाईकडे ( रा. बारापाटी, कमान ता.खेड ), दिपक कोंडीभाऊ पाबळे रा. कोर्टाचे पाठीमागे राजगुरुनगर ता. खेड ) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. कंटेनर व गुटख्यासह एकूण २८ लाख,८२ हजार चारशे रूपये किंमतीचा मुद्देमाल खेड पोलिसांनी जप्त केला असून पुढील तपास पोलिस करीत आहे.