पुणे : पुणे शहरात सुमारे ३५०० गणेश मंडळे आहेत. त्यापैकी १०० ते २०० मंडळे वगळता सर्व जण गणपती बसवतात. पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार तब्बल २५०० हून अधिक मंडळे या उत्सवात सहभागी होतात. तर गणरायाच्या सेवेसाठी तब्बल २ हजारहूनही अधिक ट्रॅक्टरमालकांनी बाप्पासाठी सेवा दिली. या ट्रॅक्टरमालकांची चांदी झाली असून, कोट्यवधींची उलाढाल झाली आहे.
मांडव, देखावे, पहिल्या आणि शेवटच्या दिवशीची मिरवणूक या सर्वांचे आर्थिक नियोजनही केले जाते. त्यामध्ये ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचा समावेश होतो. पूर्वी बाप्पाची मिरवणूक बैलगाडा, घोडागाडी अथवा ट्रकमधून काढली जात होती. बदलत्या काळानुसार ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला प्राधान्य दिले जाऊ लागले. पुण्यात ३ हजारांच्या आसपास गणेश मंडळे उत्सवात सहभागी होतात. त्यापैकी २ हजारांहून अधिक मंडळे मिरवणुका काढतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी १०० मंडळे वगळता सर्वच मंडळांकडून मिरवणूक काढून गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली जाते, तर अनंत चतुर्दशीला ६०० ते ७०० मंडळे वगळता सर्वच विसर्जन मिरवणूक काढतात.
ट्रॅक्टरचालक एका मंडळाकडून गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशी या दिवसांच्या मिरवणुकांचे २५ ते ३० हजार घेतात. प्राणप्रतिष्ठेच्या मिरवणुकीला एक ट्रॅक्टर आणि एक ट्रॉली दिली जाते. तर विसर्जनाला एक ट्रॅक्टर आणि दोन ट्रॉली दिल्या जातात. पहिल्या दिवसाच्या मिरवणुकीसाठी ५ ते ७ हजार आणि शेवटच्या दिवशीच्या मिरवणुकीसाठी १० ते १५ हजार अशी विभागणी केली जात असल्याची माहिती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली.
कुठून येतात ट्रॅक्टर?
पुणे जिल्ह्यातील भोर, आंबेगाव, सासवड, राहू, वीर, जेजुरी, बारामती, इंदापूर, जुन्नर, शिरूर, मुळशी, खंडाळा अशा अनेक भागांतून गणेशोत्सवासाठी पुण्यात ट्रॅक्टर आणि ट्रॉली दाखल होतात.
काही मंडळांकडे १० दिवस ट्रॅक्टर
गणेश चतुर्थीला ट्रॉलीवर आकर्षक महाल, अथवा फुलांच्या सजावटीचे रथ तयार केले जातात. हेच रथ बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मांडवात देखावा म्हणून ठेवले जातात. आणि अनंत चतुर्दशीला या रथावरून बाप्पाला निरोप दिला जातो. काही मंडळे एकदा ट्रॅक्टर, ट्रॉली मागवल्यावर थेट दहा दिवसांनी चालकाकडे सोपवतात. त्याचे एक, दोन हजार वेगळे घेतले जातात. तर काही मंडळांच्या मागणीनुसार प्राणप्रतिष्ठेच्या एक दिवस अगोदर आणि विसर्जनाच्या एक दिवस अगोदर शहरात दाखल होत असतात.
आम्ही वर्षानुवर्षे सेवा देऊ
आम्ही गेली १० ते १५ वर्षे गणरायाची सेवा करत आहोत. मिरवणुकीसाठी दरवर्षी न चुकता आम्ही ट्रॅक्टर आणि ट्रॉली देतो. एकदाही आम्ही खंड पडू दिला नाही. फक्त मागील दोन वर्षे कोरोनामुळे उत्सवात खंड पडला. ट्रॅक्टर देण्याबरोबरच पुण्याची विसर्जन मिरवणूक आम्हाला पाहता येते. बाप्पाला ट्रॅक्टरवरून घेऊन जाताना एक वेगळाच आनंद आम्हाला मिळतो. - सचिन चांदगुडे (ट्रॅक्टर चालक, राहू)
मंडळाच्या कार्यकर्त्यांकडूनही सहकार्य केले जाते
बाप्पाच्या सेवेसाठी ट्रॅक्टर दिल्याने वर्षभर आम्हाला त्याच ट्रॅक्टरमधून उत्पन्न मिळत राहते. आम्ही १० वर्षांपासून मंडळाला ट्रॅक्टर, ट्रॉली देत आहोत. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडूनही सहकार्य केले जाते. एक ट्रॅक्टर २५ ते ३० टन माल सहजरीत्या ओढत असतो. मिरवणुकीत बाप्पाची आणि स्पीकरची ट्रॉली धरून ५ ते ६ टन होते. त्यामुळे ट्रॅक्टर चालवण्यात अडथळा निर्माण होत नाही. - सुनील नानगुडे, (ट्रॅक्टर चालक, वीर)
- एकूण गणेश मंडळे : ३५००- पहिला दिवस मिरवणूक - दरवर्षी अंदाजे ३ हजार मंडळे- शेवटचा दिवस मिरवणूक - दरवर्षी अंदाजे २ हजारांहूनही अधिक मंडळे
- प्रमुख रस्त्यांवरील दरवर्षीच्या मिरवणुकांची नोंद - अंदाजे ५०० ते ७००- दरवर्षी दाखल होणारे ट्रॅक्टर आणि ट्रॉली - २ ते अडीच हजारच्या आसपास
- एक टॅक्टर दोन ट्रॉली - दोन्ही दिवस - २५, ००० ते ३०, ०००- एक ट्रॅक्टर एक ट्रॉली - शेवटचा दिवस - १० ते १५,०००- एक ट्रॅक्टर एक ट्रॉली - पहिला दिवस - ५ ते ७ हजार