सांगवी : बारामती- फलटण रस्त्यावरील खड्ड्यात रात्रीच्या वेळी अंदाज न आल्याने दुचाकी आदळून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.३१) सायंकाळी साडे सातच्या सुमारास घडली.
सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथील दुचाकीस्वार हा बारामतीहून फलटणच्या दिशेने घरी निघाला होता. रस्त्यावर दिसेल तिथे खड्डेच खड्डे आहेत. हे खड्डे चुकवत तो पुढे येत होता. मात्र,बावीस फाट्याच्या पुढील श्रीनाथ लॉन्स जवळ अंधारात मोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने खड्ड्यात दुचाकी आदळून हा दुचाकीस्वार रस्त्यावर आपटला असता त्याच्या डोक्याला जबर मार लागून रक्तस्त्राव झाला आहे.
दरम्यान रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसह स्थानिकांनी रुग्णवाहिका बोलावून या अपघातग्रस्त व्यक्तीला बारामती येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. दुचाकीस्वराची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. तर रविवारी देखील संध्याकाळी एक महिला दुचाकीस्वार याच ठिकाणी खड्डा चुकवीताना घसरून पडल्याचे स्थानिकांनी सांगितले. अंधारात रस्त्याने खड्डेच दिसत नसल्याने रात्रीच्या वेळी अपघातात वाढ होऊ लागली आहे. यामुळे प्रशासन किती लोकांचे जीव जाण्याची वाट पाहत बसणार आहे. असा सवाल उपस्थित झाला आहे.