पिंपरी : भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मुंबई-पुणे महामार्गावर देहूरोड ते निगडी दरम्यान १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला होता. याप्रकरणी तीन आठवड्यांनी गुन्हा दाखल झाला.
सागर दिनकर वानखेडे (वय २७) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. विजय दिनकर वानखेडे (३१, रा. तळेगाव दाभाडे, मूळ रा. पिंपरी कोळी, ता. नांदुरा, जि. बुलढाणा) यांनी शुक्रवारी (दि. ८) देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सचिन ज्ञानोबा कुऱ्हाडे (२५, रा. टावर लाइनजवळ, निगडी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय यांचा भाऊ सागर हे त्यांच्या वैयक्तिक कामाकरिता त्यांच्या दुचाकीवरून जात होते. त्यावेळी मुंबई-पुणे महामार्गावर देहूरोड ते निगडी दरम्यान संशयित सचिन कुऱ्हाडे याच्या भरधाव चारचाकी वाहनाने सागर वानखेडे यांच्या दुचाकीला धडक दिली. यात जखमी झाल्याने सागर वानखेडे यांचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद आहे.