नारायणगाव (पुणे) : मराठ्यांच्या पोरांच्या अस्तित्व व शिक्षणासाठी आरक्षण लागतंय, ज्याला काढायचं काढा आणि ज्याला काढायचं नाही त्यांनी काढू नका. तुला काय राह्यचं राहा, गोरगरीब मराठ्यांच्या पोराचं शिक्षणात, नोकरीत कल्याण होत असेल तर आडवं कोणी पडायचे नाही. कोणी आमच्या अन्नात माती कालवायचा प्रयत्न करू नका, असा टोला मराठा कुणबी आरक्षणास विरोध दर्शविणाऱ्या नारायण राणेंसह विरोधकांना लगावत शांततेतील युद्ध सरकारला पेलवणारं नाही आणि झेपणारं नाही, असे सांगत आरक्षण घेतल्याशिवाय हटणार पण नाही, असा इशारा मनोज जरांगे - पाटील यांनी नारायणगाव येथे दिला आहे. दरम्यान, २१ तारखेपर्यंत आरक्षण न मिळाल्यास २२ तारखेपासून आंदोलनाची दिशा जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
किल्ले शिवनेरी येथे नतमस्तक होऊन खेड येथील सभेकडे रवाना होताना मराठा समाज बांधवांच्या वतीने मनोज जरांगे - पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आ. शरद सोनवणे, संतोषनाना खैरे, माजी सरपंच योगेश पाटे, संतोष वाजगे, अक्षय वाव्हळ, अजित वाजगे, बंटी वाजगे, राकेश खैरेंसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मराठा समाजातील व्यक्तीने आत्महत्या केल्याने सत्कार न घेता मनोज जरांगे - पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मनोज जरांगे - पाटील म्हणाले की, कुणबी हा जुना शब्द आहे. आता शेती हा शब्द आहे. पूर्वी हॉटेल म्हणत होते. आता रेस्टॉरंट म्हणतात. त्यावेळी पायतान म्हणायचे आता चप्पल म्हणतात, त्याचप्रमाणे कुणबी हा शब्द शेती आहे,
आता कुणी आत्महत्या करायची नाही आणि करूही द्यायची नाही. आंदोलन उग्र करू नका. शांततेच्या मार्गानेच निर्णयाच्या प्रक्रियेत आरक्षण आणणारच, असे म्हणत आपल्याला परिवारातील भावाने आत्महत्या केली. दुःखाचा डोंगर कोसळला, हे बलिदान वाया जाऊ देणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय सुटी नाही. कुणबी म्हणजे भयानक शब्द नाही. आजोबा, पणजोबा पूर्वी म्हणत माझा मुलगा कुणबी करतो. आता सुधारित शब्द शेती आहे. शांततेच्या मार्गानेच निर्णयाच्या प्रक्रियेद्वारे आरक्षण आणणार. येत्या २२ तारखेला आंदोलनाची पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल, अशी माहिती जरांगे - पाटील यांनी दिली.