पुणे : नानापेठ परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय उच्चशिक्षित चोराने १७ मोबाईल चोरी करुन ते विक्री करण्यासाठी नामांकीत कंपनीच्या मोबाईल बिलाचा दुरुपयोग केल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. शिवाजीनगर पोलिसांनी त्याचा छडा लावत आरोपीला अटक केली आहे. ओंकार विनोद बत्तुल (वय- २२, रा. नाना पेठ) असे अटक केल्याचे नाव आहे.
काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार आली होती. शिवाजीनगर जुना तोफखाना भागातील तक्रारदारांच्या फर्निचरच्या दुकानातून ४ जानेवारी रोजी काउंटरवर ठेवलेला सॅमसंग कंपनीचा असलेला मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केला होता.याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास करत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने आणि पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. चोरीला गेलेल्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक व पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे, आदेश चलवादी, रुचिका जमदाडे यांनी शिवाजीनगर भागात सापळा रचून आरोपीचा छडा लावला.
चौकशी केली असता त्याने नामांकीत इलेक्ट्रॉनिक वस्तु विक्री करणान्या कंपनीच्या मोबाईलच्या मुळ बिलाच्या पीडीएफ मध्ये चोरी केलेल्या मोबाईलचे डिटेल्स एडिट करुन त्याची पीडीएफ तयार करुन तो चोरी केलेला मोबाईल स्वतःचा असल्याचे भासवले. पुढे तोच मोबाईल दुकानदाराला बनावट बिलाची पीडीएफ व स्वतःच्या आधार कार्डच्या आधारे विक्री केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीने गुन्ह्यातील विक्री केलेला मोबाईल व इतर अशा प्रकारे चोरी केलेले एकुण १७ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तसेच मोबाईल खरेदी-विक्री करणान्या व्यापा-यांनी जुने बापरलेले मोबाईल खरेदी-विक्री करताना मोबाईल बिलाची पडताळणी करुन मगच व्यवहार करावे असे आवाहन पुणे शहर पोलीसांकडून करण्यात आले आहे.